दोन गझला : रमेश बुरबुरे

 

१.
देह हा घायाळ झाला चुंबनाने
तप्त ओठांच्या तुझ्या त्या घर्षणाने

जर मनावर घाव आहे आठवांचा
मग कुठे द्यावेत टाके सर्जनाने

पाहुनी लावण्य गोऱ्या यौवनाचे
लाजुनी तडकून जावे दर्पणाने

आज ही आकाशगंगा तृप्त झाली
लख्ख तेजोमय तुझ्या त्या दर्शनाने

एक होती तू जिच्यावर भाळलो मी
मजकडे प्रस्ताव होते दर्जनाने

लोह झालो मी कधी कळलेच नाही
ओढले तू चुंबकी आकर्षणाने

३.
टाकावया प्रजेला, कोमात रोगजंतू!
खादीतुनी प्रसवला, वस्त्यात रोगजंतू!

मृत्यूमुखी पडाव्या,साऱ्याच धर्म जाती,
जन्मास एक यावा, देशात रोगजंतू!

समतेस पोखराया, रंगामधून शिरला,
अदृश्य विषमतेचा, रक्तात रोगजंतू!

मी हात,पाय,डोके,छाटू कुणाकुणाचे?
प्रत्येक माणसाच्या,डोक्यात रोगजंतू!

माझी सुतार कामे,जाहीर या जगाला,
तासून काढतो मी, रंद्यात रोगजंतू!

केरात अर्भकांना, पाहून स्पष्ट होते,
शिरलाय  वासनेचा, प्रेमात  रोगजंतू!

दंग्यामुळे निघाला,ढवळून देश सारा,
दगडामधून घुसला, भक्तात रोगजंतू!
.........................................

रमेश बुरबुरे
रा. निंबर्डा, पो. शिरोली
ता. घाटंजी, जि. यवतमाळ
मो न 9767705170

1 comment: