१.
किती आणखी सहन करावी ही जुमल्यांची हूल संसदे ?
किती काळ उघड्यावर मांडू ही दगडांची चूल संसदे ?
रिती गाडगी , तवा रिकामा , थंड चूल अन् मुले उपाशी
पिठ म्हणोनी मळू कितीदा 'अच्छे दिन'ची धूळ संसदे ?
पाच किलो तांदूळ किलोभर चणे देउनी घरी कोंबले
तेलमिठास्तव गहाण ठेवू ? काय पोटचे मूल संसदे ?
स्वातंत्र्याने अभिजनांच्या नांवे केले अमुचे खसरे
दिले आमच्या वाट्याला हे 'फूटपाथ' अन् पूल संसदे !
न्याय आंधळा शासन बहिरे , 'मिडिया' मिंधा 'भक्त' मेंढरे
तुला दिसेना आज भारता दिली कोणती भूल संसदे ?
समरसता समतेहुन सुंदर भासे आजघडीला कारण
समरसतेने पांघरलेली देशभक्तिची झूल संसदे !
खरेच जर का तुला वाटते मुळात समता समजुन घ्यावी
ऐक कधी तू 'वामन कर्डक' , वाच कधी 'बागूल' संसदे !
२.
दिसतात आज गांवे गळफास लावलेली
तारण जशी कुणाच्या कर्जास लावलेली
गोठ्यात बैल नाही दुसरा उपाय नाही
जोडी कुणी मुलांची वखरास लावलेली
कोसळ हवा तसा तू पण एकदा तरी बघ
ठिगळे किती ठिकाणी छपरास लावलेली
हे हात राबणारे लाचार का ? रिते का ?
किम्मत जरा तपासा घामास लावलेली
मेले किती भुकेने ! ऐकून भूक मेली
पोळी थिजून गेली ओठास लावलेली
जर यापुढे उपाशी गांवी मजूर मेला
एकेक वीट मोजू शहरास लावलेली
श्रमिकांस का नसावी देशात या प्रतिष्ठा ?
ती पुस्तके तपासा वर्गास लावलेली
ये ताकदीनिशी ये धमक्या नकोत पोकळ
ही शर्त वादळाच्या कहरास लावलेली
उजळावया जगाला जळतो दिव्याप्रमाणे
ही सूर्यशिस्त आम्ही जगण्यास लावलेली
......................................................
अशोक बुरबुरे
हिंगणघाट ,
हिंगणघाट ,
( 9970546236 )
