दोन गझला : भागवत घेवारे


१.


नुसताच होत आहे आभास पांडुरंगा
पण लाभतो कुठे रे सहवास पांडुरंगा


जातो जिथे तिथे तू असतोस संगतीला
ठरवू नकोस खोटे तुकयास पांडुरंगा


ते काढ हात आता कमरेवरून खाली
दे दोन घास भोळ्या नामास पांडुरंगा


भक्तांस तारणारा म्हणतात लोक तुजला
आला असा कसा हा वनवास पांडुरंगा


गोरा अजून आहे तैसाच त्या ठिकाणी
कर नीटनेटके त्या मडक्यास पांडुरंगा


शेतास सावत्याच्या विसरु नकोस बाप्पा
पाऊस पाडण्या कर सायास पांडुरंगा


शरणांगतीस 'बाळू' आहे सदैव तत्पर
हृदयात मात्र व्हावा रहिवास पांडुरंगा    


२.


तूच माझा मित्र व्हावे पंढरीच्या पांडुरंगा
रोमरोमी तू भिनावे पंढरीच्या पांडुरंगा


अर्जुनाची पात्रता माझ्याकडे नाही जरी गा
सारथी माझा बनावे पंढरीच्या पांडुरंगा


बोल मुक्तेचे कळाया घालवावे जीवना अन्
चांगयाचे पत्र व्हावे पंढरीच्या पांडुरंगा


योजनांचा लाभ घेण्या बघ जरा नावे कुणाची
दीन त्या यादीत यावे पंढरीच्या पांडुरंगा


भेट होता सज्जनांची वाल्मिकी बनतोच वाल्या
म्हणुनि संता आठवावे पंढरीच्या पांडुरंगा


ध्यान सुंदर साठवाया लोचने व्याकूळ झाली
मी तुझ्या दारात यावे पंढरीच्या पांडुरंगा

....................................

 भागवत (बाळू )घेवारे

९४२१९७८५९७


13 comments:

 1. वाह! पांडुरंगाची आळवणी अप्रतिम! हार्दिक अभिनंदन💐💐💐

  ReplyDelete
 2. सर,आपल्या दोघंही रचना सुंदर आहेत....पंढरीच्या पांडुरंगा....जय हरी विठ्ठल

  ReplyDelete
 3. व्वा. दोन्ही गझला खूप छान.

  ReplyDelete
 4. भेट होता सज्जनांची वाल्मिकी बनतोच वाल्या
  म्हणुनि संता आठवावे पंढरीच्या पांडुरंगा

  काय अप्रतिम लिहिलंय सर. मी उदय देशमुख चा मित्र. मागे आमच्या साहित्यप्रेमी झूम मीट वर आला होता आपण.

  ReplyDelete
 5. सर,खूप छान जय हरी विठ्ठल विठ्ठल....

  ReplyDelete