१.
नवा संकल्प येतो चांगला जन्मास एखादा
जिवाला जेवढा आतून होतो त्रास एखादा
जुन्या एका पिढीचे लागते बलिदान काळाला
उगाचच जन्म घेतो का नवा इतिहास एखादा
पुढे आयुष्य घडते आपले जीवन सफल होते
मनाला एवढा बेचैन करतो ध्यास एखादा
जिवाची वाढते धडधड कुणी येणार आहे का?
खरा ठरणार आहे का मनाचा भास एखादा
नव्याची जन्मवेणा यातना सुद्धा असू शकते
विनाकारण कसा होईल सांगा त्रास एखादा
सुखे दारात आली का पुन्हा स्वप्नात गेले मी
कुणी काढा मला चिमटा जरा हातास एखादा
चकाकी येत जाते पोळल्या नंतर सुवर्णाला
म्हणोनी दु:ख देणारा हवा सहवास एखादा
२.
नीटनेटके काम फार दिवसांनी केले
मी मनातले सारे कप्पे खाली केले
देहाचे घर सुखाला दिले मी कायमचे
अन दुःखाला नाममात्र भाडोत्री केले
तुझ्या मिठीची जन्मठेप दे मला यापुढे
सांग जगाला तुझे हृदय मी चोरी केले
प्रत्येकाने मनाप्रमाणे मूर्ती केली
अन देवाच्या अस्तित्वाला दगडी केले
जगावेगळी वाट शोधणे पसंत केले
कधीच नाही कळपाला मी कॉपी केले
जन्मा आला हसला रडला आणिक मेला
जगावेगळे काम काय तू बाकी केले
माझे सुद्धा जगणे नंतर सुंदर झाले
मनात आले जे जे माझ्या ते मी केले
मी नित्य नव्या संघर्षाला कर्म मानले
म्हणून कायम दोन हात नियतीशी केले
केवढी तुझ्या सहवासाने जादू केली
रात्र गुलाबी आणिक दिवस केशरी केले
फुंकर घालत गेल्यावरती सूर उमटले
मी नाव वेदनेचे फक्त बासरी केले
३.
उभे डोळ्यात पाणी सांज झाल्यावर
कितीदा सोडली मी रात्र पाण्यावर
म्हणाले लोक जे आहोत पाठीशी
कधी धावून आले वेळ आल्यावर
मला बेभान होणे मान्य आहे पण
तुझे नसणार तेव्हा चित्त थाऱ्यावर
किती जोडून ही ठेवायची नाती
सगे सोडून जाती काम झाल्यावर
तुझी आहे खरोखर मी तुझी आहे
तुझेही प्रेम आहे फक्त माझ्यावर
पुन्हा परतून नाही यायच्या लाटा
जडावा जीव का इतका किनाऱ्यावर
कुठे आलास तू बोलावल्या नंतर
दिलेला शब्द होता फक्त वरच्यावर
ललाटी काय लिहिले नेमके माझ्या
तसेही सोडले मी भाग्य वाऱ्यावर
कधीही भाळले नाही कुणावरती
गिरवले नाव त्याचे फक्त तळव्यावर
पुढे भेटायचे मग कोणत्या जन्मी
तुझ्या हातून माझा हात सुटल्यावर
४.
जिंकलो दुनिया अशा तोऱ्यात आपण
जन्मभर रमतो दिवास्वप्नात आपण
आपली फुलपाखरे होणार बहुदा
अडकलो आहोत ना कोषात आपण
प्रेम आपुलकी सुखाची झोप होती
ठीक होतो आपल्या गावात आपण
सोडतो कोठे स्वतःच्या मी पणाला
सारखे पडलो जरी खड्ड्यात आपण
जन्मभर आपापल्या मस्तीत जगलो
काय केले खास या जन्मात आपण
जन्म सरला पण तरीही भेट नाही
एकमेकांच्या नसू भाग्यात आपण
अडचणी येतात तर येवोत आता
वेगळे घडतो म्हणे कष्टात आपण
जन्म म्हणजे नेमके मग काय आहे
काढतो आयुष्य या प्रश्नात आपण
लेकरे सगळी प्रभूची मानतो पण
देव सुद्धा वाटतो धर्मात आपण
व्हायचे आहे प्रवाही आपल्याला
का तरीही साठलो डबक्यात आपण
...................................
मनीषा नाईक