तीन गझला : श्रीराम गिरी


 

१.

शोधले तुला नावात तुझ्या;
तू हरवलास कैफात तुझ्या.

कर सिंचन अश्रूंचे मजवर;
ही नको खळी गालात तुझ्या.

लागेल कसे फळ कपटाला:
नाही इमान घामात तुझ्या.

जो निरागस अन् निष्ठावंत;
वापर त्याला वादात तुझ्या.

केलीस खरी सुरुवात इथे;
शेवट नाही हातात तुझ्या.

 

२.

कष्टी मनात का हे;
अश्रू अनाथ का हे.

रस्त्यावरील वादळ;
शिरले घरात का हे.

वाचून गझल कोणी;
धरतात दात का हे.

जहरास काय पुसतो;
लपले नखात का हे.

वारे अता तुझ्याही;
भिनले पखात का हे.

साधे तुला कळेना;
तारे नभात का हे.

लपलेत सूर्य कोठे:
विरले तमात का हे.

 

३.

ह्या दु:खाचा भार मला दे;
इतका तू अधिकार मला दे.

काढ भोवतीचे हे कुंपण;
दुनियेचा विस्तार मला दे.

तुझ्याकडे ठेव पिस्तुल, बाॅम्ब;
शब्दांची तलवार मला दे.

वही, लेखणी अन् हे पुस्तक;
हा माझा संसार मला दे.

कर नावे फुलबाग तुझ्या ही;
हा काट्यांचा हार मला दे.

टाळाटाळ अगोदर कर अन्;
नंतर तू होकार मला दे.

ठेव झरोका ह्दयाला ह्या;
मायेचा संस्कार मला दे.

...............................

श्रीराम गिरी 

 



1 comment:

  1. 🌷 तीनही गझल सुंदर 🌷

    वही लेखणे अन् हे पुस्तक
    हा माझा संसार मला दे

    आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

    ReplyDelete