दोन गझला : श्रीपाद जोशी


 
१.
 
तुझे लिहू की सांग जगाचे कुणाकुणाचे हसू लिहू..?
स्वतः स्वतःचे रडू लिहू की स्वतः स्वतःचे हसू लिहू?

तुझ्या सावलीवरती झाले लिहून वारेमाप अता
सरीत भिजल्यावरी पोळल्या तप्त उन्हाचे हसू लिहू ?

तुझ्या नकारानंतर रडलो कोसळलो उन्मळलो मी
त्या वेळेची खंत लिहू की दुर्भाग्याचे हसू लिहू ?

चौकटीत राहिलो बोललो वर्तुळ आखत गेलेलो
त्या त्रिज्येची मिती लिहू की त्या गोलाचे हसू लिहू ?

एक शहर की ज्याला माझे असणे नसणे खुपणारे
की मग फुगल्या-रुसल्यानंतरच्या शहराचे हसू लिहू ?

२.
गोड तोंडावरी बोलणारे किती..!
छान वाटून जातात सारे किती

बंद केलीस खिडकी मनाची तुझ्या
हेलकावून गेलीत दारे किती

आग रामेश्वरी; बंब सोमेश्‍वरी
आव हा केवढा हातवारे किती

फक्त मोजायचे एकट्याने पुन्हा ?
राहिल्या चांदण्या आणि तारे किती..

उंच लाटांतला फक्त निर्धार बघ
राहिले रोखणारे किनारे किती..

दंश होता तुझा रेशमासारखा
अंगभर उमटलेले शहारे किती

नेमके काय आहेस तू जाळले
आग ही केवढी अन निखारे किती

चाळणारे किती वाचणारे किती
आणि छातीस कवटाळणारे किती

हात सोडून जातील सारे पुढे
सोबती आपल्या राहणारे किती

वाट विसरून गेलेत कोणीतरी
वाट आहे कुणी पाहणारे किती
..............................

श्रीपाद जोशी,
पो केलवड ता. राहता
जि. अहमदनगर (महाराष्ट्र) 423107
संपर्क - 9730730222
 
 


No comments:

Post a Comment