आँख में पानी रखो होटों पे चिंगारी रख्खो : सुरेशकुमार वैराळकर

 
माणसाने, माणसाशी माणसाप्रमाणेच वागावे अशी भावना कायम मनी बाळगणारे आणि स्वत:पासून समाजापर्यंत सगळ्यांवर आपल्या गझलेतून थेट भाष्य करणारे बुलंद शायर राहत इंदौरी यांना केलेला हा मानाचा मुजरा!

...........................
शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांची राहत इंदौरी यांना आदरांजली.
.........................
'अब न मैं हूँ,न तो बाकी है जमानें मेरे
फिर भी मशहूर है शहरों में फसाने मेरे.'
            असे म्हणणारे, गझल क्षेत्रातले राहत इंदौरी हे झंझावाती पर्व संपुष्टात आले. ज्याला आपण इंदौरी साहेबांचे युग असे म्हणतो, ते खरे तर शायरीच्या सुधारणावादी विचारप्रवाहाचे किंवा विचारधारेचे युग आहे. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध,म्हणजे साधारणपणे १९८१ ते २०२० हा कालखंड पाहिला,तर सर्वच क्षेत्रांत आमुलाग्र बदल घडविणारा हा कालखंड आहे. साहित्य हे मानवी जीवनाचे एक अंग आहे. त्या त्या काळातल्या घडामोडींचे प्रतिबिंब कथा-कादंबऱ्या, नाटक -चित्रपट, कविता-गझल यांत उमटणे अपरिहार्य असते. आणीबाणीची पार्श्वभूमी असणारा हा कालखंड राहत इंदौरी या बुलंद शायरीपर्वाचा उदयकाळ,असे निश्चितच म्हणता येईल. गझल कवितांचा तो जमाना. 'किताबी ग़ज़ल' आणि 'मुशायरोंकी ग़ज़ल' असे दोन प्रवाह पूर्वीपासून चालत आले आहेत. यात छापील गझल वा कविता ही साहित्य-स्वरूपात समोर येते आणि मुशायऱ्यातली थेट रसिकांसमोर सादर होते.
                    मंचीय कविता वा गझल ही अस्सल दर्जाची नसल्याचा आरोप जाणकार,वा समीक्षकांकडून नेहमीच केला जातो.साधारण दर्जाच्या कवितेत वाङ्मयीन मूल्य कमी असूनही, सादरकर्त्याची शैली अधिक दाद मिळवून जाते,असाही विचारप्रवाह त्यात आहे.त्यातूनच 'मुशायरोंका शायर' असे शिक्के मारले जातात. मात्र असेही काही शायर वा गझलकार झालेत, ज्यांचे लिहिणे दमदार, गझल उच्च वाङ्मयीन दर्जाची आणि मंचीय सादरीकरणही तितक्याच ताकदीचे आहे. हा दुर्मिळ संगम ज्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो,त्या गझलकारांमध्ये राहत इंदौरी हे नाव अग्रस्थानी आहे.
                    इंदौरी साहेबांचा बुलंद आवाज, शेरानुसार आवाजातले चढ-उतार आणि त्यांची देहबोलीही जणू त्या शब्दांमध्ये गुंफली जायची. त्यांच्या मुशायऱ्याला त्यामुळेच दर्दींची गर्दी व्हायची. चैतन्यदायी वावर आणि शेवटपर्यंत सभागृह जिवंत ठेवण्याची ताकद इंदौरींच्या सादरीकरणात होती. देशप्रेम,व्यथा वा राजकीय व्यंग,या मर्यादेतच व्यक्त झाल्याचा आरोप अनेकदा सुधारणावादी शायर वा गझलकारांवर होतो. इंदौरीसाहेबांबाबत बोलायचे, तर त्यात तथ्य नाही असेच म्हणावे लागते. जगण्यातल्या सगळ्या भावभावनांवरही ते तितकेच समर्पकपणे व्यक्त झाले आहेत. प्रेमभावना ही कुठल्याही साहित्याची,कविता वा गझलची आदिम भावना म्हटली जाते. तिथेही इंदौरीसाहेबांची आगळी वेगळी शैली आपल्याला चकित करतेः
'राज जो कुछ हो इशारों में बता भी देना
हाथ जब उस से मिलाना तो दबा भी देना'.
'कभी दिमाग,कभी दिल,कभी नजर में रहो
ये सब तुम्हारे ही घर हैं किसी भी घर में रहो'

इथे त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटते.त्यांच्या पुढच्या ओळीही एखाद्या शायर-गझलकाराच्या मनाचा ठाव घेतील अशा आहेत. मिष्किलपणे ते म्हणतातः

'नश्शा वैसे तो बुरी शै है मगर राहत से,
शेर सुनना हो तो थोडी सी पिला भी देना '

            जीवनाचे तत्त्वज्ञान असो किंवा दोस्तीचे नाते,कधी त्यात येणारा दुरावा, यावरही त्यांचे व्यक्त होणे मनाला स्पर्शून जाणारेः

'दोस्ती जब किसी से की जाये
दुश्मनों से भी राय ली जाये '

            जगणे साजरे करताना,ज्याला सामोरे जाणे अटळ आहे,अशा मृत्यूशीही मैत्री करावी,असे ते सांगतातः

'इक ही नदीं के,ये दो किनारे है दोस्तों
दोस्ताना जिंदगी से, मौत से यारी रख्खो'
'आँख में पानी रख्खो, होटों पे चिंगारी रख्खो
जिंदा रहना है तो, तरकिबे बहोत सारी रख्खो'.

                        इंदौरी साहेबांच्या लेखणीतील सामाजिक भावना तीव्र होती. कुठलीही रोखठोक मांडणी कशी असावी,याचा दाखलाच जणूः

'सब प्यासे हैं सबका अपना ज़रिया है, बढ़िया है
हर कुल्हड़ में छोटा मोटा दरिया है...बढ़िया है'

'अंधी गूँगी बहरी सियासत रस्सी पर चलती है,
कई मदारी हैं और एक बन्दरिया है...बढ़िया है'

'इमानों का सौदा इन्ही दुकानों में होता है,
संसद क्या है भय्या, इक बजरिया है... बढ़िया है'.

                राजकारणाकडून ही लेखणी जेव्हा स्वतःकडे येते,तेव्हा ती एकट्या इंदौरी साहेबांची नव्हे,तर  प्रत्येक खुद्दार वा स्वाभिमानी कलावंताचीच भावना असतेः

'शाखों से टूट जाए,वो पत्ते नहीं है हम
आँधी से कोई कह दे,औकात में रहें'

            लोक स्वतःबाबत खूपच जागरूक असतात. बाहेर पडल्यावरही स्वतःचीच काळजी करणाऱ्या वृत्तीबाबत ते म्हणतात:

'लोग हर मोड पे, रुक रुक के संभलते क्यूँ है
इतना डरते है तो फिर घर से निकलते क्यू है'.

                    अशी या माणसाची जडणघडण आहे. कलावंताने नेहमी जागल्याची भूमिका निभावली पाहिजे. समाजात जे वाईट, विघातक आहे,त्याला स्पष्टपणे विरोध करण्याचे काम कलावंतांचे आहे,असे मानणारा वर्ग आहे. इंदौरी हे त्याचेच प्रतिनिधी आहेत. व्यवस्था ही नेहमीच स्थितीप्रिय असते. बदल वा क्रांती या व्यवस्थेच्या पचनी पडणारी नसते. सत्तेला स्वतःचे अंगभूत गुणदोष असतात. व्यवस्थाशरणता पत्करून लोटांगणे घालण्याची वृत्ती भल्याभल्यांचे ठायी  दिसते. अशा काळात व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून ठामपणे तिला खडे बोल सुनावण्यासाठी मोठी हिंमत लागते. ती हिंमत इंदौरी साहेबांकडे होती. महाराष्ट्रभरात त्यांचे मुशायरे झाले. प्रसिद्ध शहरांसह मालेगाव, भिवंडी, औरंगाबाद, अंबाजोगाई इथलेही मुशायरे पहाटेपर्यंत रंगत. त्यांची स्पष्ट आणि नीडर मांडणी दाद मिळवून जात असे. व्यवस्थेला जाब विचारणे असो किंवा समाज ढवळून टाकणाऱ्या घटना वा परकीय आक्रमणे... इंदौरींची लेखणी व्यक्त होतेच-

'अगर खिलाफ है, होने दो,जान थोडी है
ये बस धुआँ है, कोई आसमान थोडी है'.
'लगेगी आग तो आएंगे घर कई जदमें
यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोडी है'.
'जो आज साहिबे मसनद है कल नहीं होंगे
किरायेदार है,जाती मकान थोडी है'.
'हमारे मुँह से जो निकले,वही सदाकत है
हमारे मुँह में,तुम्हारी जुबान थोडी है '
'सभी का खून है शामिल यहां की मिट्टी मे
किसी के बाप का हिंदोस्तान थोडी है '

        अशा चौफेर दौडणाऱ्या त्यांच्या शायरीचा आस्वाद घ्यावा तितका कमीच. समारोपाला येताना आपल्या देशातल्या एकतेवर असो किंवा जात,धर्म,पंथ भिन्न असूनही या देशावर असणाऱ्या सर्वांच्या हक्काबाबत असो, त्यात काही व्यथाही डोकावते. ठराविक लोकांमुळे संपूर्ण  समुदायाला बदनाम व्हावे लागण्याची  व्यथा त्यांनी शब्दांत गुंफली आहेः

'हो लाख जुल्म मगर, बद् दुआं नहीं देंगे
जमीन माँ है,जमीं को दगा नहीं देंगे'.

        समारोप करताना, त्यांनी आपल्या मातीवरचे प्रेम व्यक्त करताना लिहिलेला एक शेर... ते म्हणतातः

'मैं जब मर जाऊं, तो मेरी अलग पहचान लिख देना
लहूँ से मेरी पेशानी पे हिंदोस्तान लिख देना...'

            माणसाने, माणसाशी माणसाप्रमाणे वागावे अशी भावना कायम मनी असणाऱ्या या बुलंद शायराला म्हणूनच मानाचा मुजरा!

-सुरेशकुमार वैराळकर

(लेखक सुरेश भट गझलमंच,पुणे या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आहेत)
.....................................................
महाराष्ट्र टाइम्स. रविवार दि.१६ आॕगस्ट २०२० वरून साभार
...............................................
.

No comments:

Post a Comment