दोन गझला : निशा डांगे



१.
हे तुझे पाहणे मंगळासारखे
बोलणे चाबकाच्या वळासारखे

हे अवेळीच येणे नि जाणे तुझे
का असे वागणे वादळासारखे

दूर सारून हे खाचखळगे जुने
हो नव्याने प्रवाही जळा सारखे

घ्यायची तर कधीही परीक्षाच घे
ठेवले मी हृदय तांदळा सारखे

साचलेले मळभ काढ बाहेर तू
मन दिसू दे नदीच्या तळा सारखे

बोलणारे स्वतः वागती का तसे?
संत होऊन मग सोज्वळा सारखे

घाबरावे असे काय वेड्या उगा?
शीक वागायला कातळा सारखे

२.

एकच आले वादळ मोठे अन् मी विझले होते 
क्षणात एका माझ्यामधुनी मीच हरवले होते

दुःखे शिवली किती फाटक्या आभाळाची तेंव्हा,
शिवता शिवता आभाळाला मीच उसवले होते!

वजा स्वतःला करून कायम माझ्यात तुला गुणले
तेव्हा कोठे संसाराचे कोडे सुटले होते

जल्लोष किती होतो आहे रे विजयाचा आता
कुणास ठावे जिंकण्यास मी  शतदा हरले होते

समोर आली जरी संकटे मी डगमगले नव्हते
झुकले नाही कुणासमोरी म्हणून तगले होते
.....................................................

निशा डांगे
पुसद

3 comments:

  1. मनःपूर्वक धन्यवाद सीमोल्लंघन टिम

    अतिशय सुंदर व मार्गदर्शक अंक

    ReplyDelete
  2. सुंदर....
    अभिनंदन निशा

    ReplyDelete