१.
लावते आई तिच्या पोटास कात्री
मी पुढे दचकून उठतो मध्यरात्री..
जन्म मृत्यूची कशी एकाचवेळी
श्वास रंगवतो भुमीका एकपात्री..
आसवांना राहिला नात्यात संभ्रम
माणसांची दयायची कोणास खात्री..
सोडली ओठातली तू मोहमाया
जाळुनी देहातल्या कित्येक रात्री..
संग्रही ठेवायचे तुजला म्हणोनी
ठेवला भेटीतला मी स्पर्श गात्री..
चालण्या आधीच कोणी थांबल्यावर
खूप रडतो आत माझ्या एक यात्री.!
गोंदले भाळावरी तू दुःख माझ्या
कायदयाने तूच माझी जन्मदात्री..
२.
तोल सांभाळून बस काठावरी
आत नेइल ओढुनी माझी दरी
आत नेइल ओढुनी माझी दरी
शांतचित्ताने निखळला आज तो
जन्मभर जगला अढळ ता-यापरी..
नजर आहे उलटपक्षी जन्मली
थेट कळसाला समजतो पायरी..
फूल आहे एक प्रत्येकाकडे
मी कसा शोधू खरा मारेकरी..
भिन्न असते अर्थता स्पर्शातली
कोण ही जाणीव देतो अंतरी..
पत्र लिहितांनाच थरथर व्हायची
अंतता बिगडायची मग स्वाक्षरी..
जीव देहातून पळतो दूरवर
त्यास असते जायचे कुठल्या घरी?
३.
छोटी द्यावी किंवा थोडी मोठी दयावी
छोटी द्यावी किंवा थोडी मोठी दयावी
भाळावरती एक तरी रेघोटी दयावी..
पुनर्जन्म इच्छेचा होतो भोगानंतर
मजला अंतिम इच्छा तू वांझोटी दयावी..
तो कंच्याचा डाव खेळतो तारे वेचुन
त्याच्या हाती या पृथ्वीची गोटी दयावी..
करता यावे श्वासांचेही दागदागिने
तू सर्वांना अशी एक हातोटी दयावी..
फक्त भुकेचा बांधुन घेतो पायी चकवा
समोर माझ्या तू भासाची रोटी दयावी..
येउ नये जन्माला नंतर माझ्या भरती
कुणीतरी मज कायमची ओहोटी दयावी..
.......................................................................
मारोती पांडूरंग मानेमोड
नांदेड
वाह! तीनही गझला अप्रतिम👌👌
ReplyDeleteधन्यवाद सरजी
Deleteतिन्ही रचना अप्रतिम.👌🌹🦚
ReplyDeleteधन्यवाद भाऊ
Delete1) स्पर्श
ReplyDelete2) मारेकरी
3) रेघोटी
एकसे बढकर एक राया 🌹💐👌🏻👍🏼
संजय भैय्या खूप आभार...
DeleteThanks दादा
ReplyDeleteधन्यवाद सरजी,,, 👏
ReplyDelete