गणवृत्तांना लवचिक करण्याची गुरुकिल्ली : उच्चारी वजन : हेमंत पुणेकरगणवृत्तांना लवचिक करण्याची गुरूकिल्ली 'उच्चारी वजन' - हेमंत पुणेकर

                    गझल हा काव्यप्रकार इतर अनेक भारतीय भाषांप्रमाणेच मराठीत देखील जोमाने रुजतोय. माधव जूलियनांनी गझल मराठीत आणतांना फारसी, उर्दूमधे नसलेली काही बंधने तिला लावली आणि त्या मुळे तेव्हापासूनच मराठी गझलमधे काही संभ्रमसुद्धा रुजले. सुरेश भटांनी अनेक संभ्रम बाराखडीतून दूर केले परंतु काही संभ्रम आजही कायम आहेत. त्यातला एक म्हणजे उच्चारी वजन, जे अरबी, फारसी, उर्दू, हिंदी आणि गुजराती गझलेत वापरले जाते पण अजूनही मराठी गझलेत ते रुजले नाही. उच्चारी वजन गझलेची प्रवाहीता वाढवते आणि ते मराठीत वापरल्यास पारंपारिक गणवृत्तांचा ताठरपणा कमी करण्यामधे मदत होऊ शकते. उच्चारी वजन अन्य भाषेंप्रमाणेच मराठीतही गणवृत्तांना लवचिक करण्याची गुरुकिल्ली ठरू शकते. खालील प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात ही गुरूकिल्ली काय आहे आणि तिचा वापर मराठीत कसा करता येईल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
प्रश्न:- उर्दू गझल गणवृत्तांमधे लिहिली जाते की मात्रावृत्तांमधे? 

उत्तर:- उर्दू गझल अरबी-फारसी अरूझ (पिंगळशास्त्र) मधे असलेल्या गणवृत्तांसारख्या "बहर" मधे लिहिली जाते. उर्दूमधे आठमात्रांच्या मात्रावृत्तांचा वापर मीर तकी मीर ने सुरू केला. तरी आज ही उर्दू गझल ज्या ३०-३५ बहरां मधे लिहिली जाते त्यात या मात्रावृत्तसदृश बहेरे-मीरचे प्रमाण ५% पेक्षा जास्त नाही.[१]  म्हणजेच काय की उर्दूतल्या ९५% गझला या गणवृत्तांशी साम्य असलेल्या बहरांमधे लिहिल्या जातात. हिंदी आणि गुजराती गझलेतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. 

प्रश्न:- मराठी गझलेत गणवृत्तांच्या आणि मात्रावृत्तांच्या वापराचे प्रमाण काय आहे?
उत्तर:- भट साहेबा गझलेच्या बाराखडीत म्हणतात - "गझल शक्य तोवर गणवृत्तात लिहावी".[२] मात्रावृत्तांमधल्या मोजक्या गझला सोडल्या तर भट साहेबांनी बाकी गझला गणवृत्तातच लिहिल्या. त्यांच्या गझलेत मात्रावृत्तांचे प्रमाण उर्दूपेक्षा फारशे वेगळे नाही. किंबहुना ५% पेक्षा ही कमीच आहे. पण अलीकडे मराठी गझलेत मात्रावृत्तांचे प्रमाण वाढत चालले आहे. काही गझलकार फक्त मात्रावृत्तांमधेच गझला लिहिताहेत.  

प्रश्न:- गणवृत्तांसारख्या बहरांच्या वापराचे मुख्य कारण काय? 
उत्तर:- गणवृत्तांच्या ठराविक लगावलीने त्यात निबद्ध रचनांना एक नादमाधुर्य येते. गझलेच्या लोकप्रियतेत या नादमाधुर्याचे महत्वाचे योगदान आहे. म्हणूनच ज्या भाषेंमधे गझल रुळली अश्या अरबी, फारसी, उर्दू, हिंदी आणि गुजराती भाषेंमधे गझल गणवृत्तांसारख्या बहरांमधेच लिहिण्यात येते. मात्रावृत्तांचा वापर असला तरी बऱ्यापैकी कमी आहे. 

प्रश्न:- मराठी गझल मात्रावृत्तांकडे का वळत आहे? 
उत्तर:- मात्रावृत्तांमधे मोकळीक आहे. फक्त मात्रा मोजणे आवश्यक आहे. ठराविक लगावलीचे बंधन नसल्याने रचना करणे सोपे होते. 

प्रश्न:- अन्य भाषेंच्या गझलकारांना मात्रावृत्तांच्या मोकळीकेची गरज का भासत नाही? 
उत्तर:- अन्य भाषेंचे गझलकार गणवृत्तात लिहितांना उच्चारी वजनानुसार भाषेच्या "लवचिकते"चा वापर करतात. त्याने गणवृत्ते हाताळणे सोपे होते. सध्या ही पद्धत मराठीत नसल्याने मराठी गझलकारांना गणवृत्ते जास्त बंधनकारक असल्याचे जाणवते. 

प्रश्न:- उच्चारी वजन म्हणजे काय? ते पारंपारिक वजनापेक्षा वेगळे असते का? 
उत्तर:- पारंपारिक वजन लिपी प्रमाणे मोजण्यात येते. आपली लिपी संस्कृत उच्चार पद्धतीप्रमाणे ठरलेली आहे पण मध्यकालात आपल्या भाषेंवर अरबी, फारसी वगैरे भाषांचा प्रभाव पडला आणि आपले उच्चार बदलले. "कमल" या शब्दाचे लिपीप्रमाणे "ललल", "गाल" आणि "लगा" वजन शक्य असले तरी त्याचा आजचा प्रचलित मराठी उच्चार "क + मल्" असा आहे ज्याचे वजन "लगा" आहे. तर शब्दांचा आजचा उच्चाराप्रमाणे वजन वृत्तात वापरणे यालाच उच्चारी वजन असे म्हणतात. एक अजून उदाहरण पाहू. "चेहरा" हा शब्द जरी लिपीप्रमाणे "गालगा" वजनाचा असला तरी त्याचा प्रचलित उच्चार "चे+ह्+रा = चेह्रा" असाच आहे म्हणून त्याचे वजन "गागा" पण घेऊ शकतो, किंबहुना "गागा" च त्याचे जास्त योग्य वजन आहे.  उर्दू, हिंदी आणि गुजरातीत "चेहरा" चे वजन "गागा" च  घेतात. आठमात्रेंचे आवर्तन असलेले सागर सिनेमातले गाणे आठवून पहा - "चेहरा है या चांद खिला है..."

प्रश्न:- उच्चारी वजनावर आधारित लवचिकता म्हणजे काय? 
उत्तर:- अरबी-फारसी अरूझ मधून भारतीय भाषांमधे आलेला एक महत्वाचा विचार म्हणजे भाषेचा लवचिक प्रयोग. उच्चारी वजनाचाच विचार पुढे नेत असे म्हणता येते की काही स्थितींमधे गुरूचा लघु करता येतो आणि तरी शब्दांच्या उच्चाराला फारसे नुक्सान होत नाही. अगदी ढोबळपणे सांगायचे म्हटले तर - "सुटा किंवा शब्दांती येणारा एकाक्षरी गुरू लघु म्हणून घेता येतो". उर्दू, हिंदी आणि गुजरातीत लवचिकतेचे ७० ते ८० टक्के उदाहरण या वाक्याप्रमाणे आढळतील. उर्वरित २० - ३० % लवचिकते नियम बनवणे शक्य नाही. 

            पहिले एकाक्षरी आणि द्विअक्षरी गुरू म्हणजे समजून घेऊ. "कमल" मधला "मल्" हा शब्दांती येणारा गुरू आहे पण तो "म" आणि "ल" अश्या दोन मुळाक्षरांने बनलेला द्विअक्षरी गुरू आहे म्हणून तो लघु म्हणून घेता येणार नाही. पण "मोठा" या शब्दातला मधला "ठा" हा शब्दांती येणारा एकाक्षरी गुरू आहे तो लघु म्हणून घेता येतो. म्हणजे "मोठा" चे वजन जरी "गागा" असले तरी वृत्ताची गरज असल्यास त्याचे वजन "गाल" पण घेता येते. तसेच "थोडा", "घोडा", "धरती", "रस्ता", "कोणते", "याचे", "त्याचे" वगैरे शब्दांमधे शब्दांती येणाऱ्या एकाक्षरी गुरू लघु म्हणून घेऊ शकतो. "ही", "ती", "तो", "मी", "हा", "हे, "की", "या" वगैरे सुटे एकाक्षरी गुरू आहेत, ज्यांचे वजन एक लघु म्हणून ही घेऊ शकते. "त्या", "ज्या", "च्या" वगैरे जोडाक्षर असले तरी गरज असल्यास त्यांचे वजन ही एक लघु म्हणून घेता येऊ शकते. 

उर्दू उदाहरण म्हणून निदा फाजलींची ही प्रख्यात गझल बघा. सुटा किंवा शब्दांती येणाऱ्या एकाक्षरी गुरू नंतर * चे चिह्न केले आहे. 

बहर:- लगाल गाललगा गालगाल गागागा/गाललगा 
(मराठी उदाहरण "कळे न काय कळे एवढे कळून मला" - सुरेश भट) 

कभी किसी को* मुकम्मल जहाँ नहीं मिलता 
कहीं ज़मीन कहीं आसमाँ नहीं मिलता 

कहाँ चराग़ जलाएँ कहाँ गुलाब रखें 
छतें तो* मिलती* हैं* लेकिन मकाँ नहीं मिलता 

ये* क्या अज़ाब है* सब अपने* आप में गुम हैं 
ज़बाँ मिली है* मगर हम-ज़बाँ नहीं मिलता 

चराग़ जलते* ही* बीनाई बुझने* लगती है
ख़ुद अपने* घर में* ही* घर का निशाँ नहीं मिलता 

प्रश्न:- हे उर्दू/हिंदी/गुजरातीत ठीक आहे. मराठी उच्चारांप्रमाणे हे चालणार नाही असे वाटत नाही का तुम्हाला? 
उत्तर:- हा विषय भाषेचा नसून नाद-उच्चारशास्त्राचा आहे. आपल्या स्वरयंत्र आणि मुखाचा वापर करत आपण कसे उच्चार करतो आणि ऐकतांना त्या उच्चारांचे कसे आकलन होते हा विषय आहे. आणि त्या प्रमाणे कोणत्या ही भाषेत लवचिकतेचा वापर करणे शक्य आहे. म्हणूनच तर अरबी-फारसी मधून आलेला हा विचार भारतीय भाषेंमधे पण रुजला. जर उर्दू, हिंदी आणि गुजराती सारख्या भारतीय भाषेंमधे उच्चारी वजन आणि त्या अनुषंगाने भाषेचा लवचिक वापर होतोय तर हा प्रयोग मराठीत करायला पण काही हरकत नाही. 
                या प्रयोगाला सुरूवात ही झाली आहे. बडोद्याचे गुजराती आणि उर्दूचे लब्धप्रतिष्ठ गझलकार विवेक काणे यांच्या एका मराठी गझलेत लवचिकतेचा प्रयोग बघा. सुट्या किंवा शब्दांती येणाऱ्या एकाक्षरी गुरू नंतर * चे चिह्न केले आहे. त्याचे वृत्तबद्ध पठन ऐकल्यावर कळेल की अशी लवचिकता घेऊनही पठन कुठेच कर्णकटू होत नाही. 

वृत्त: गा गाललगा गाललगा गाललगा गा 
("उनको ये* शिकायत है* की* हम कुछ नहीं* कहेते" याच वृत्तात आहे)

लपवावी* नजर, डोळाही चुकवून पहावे
मुद्दाम स्वतःलाच आपणहून पहावे

दिसतो का* तरी तळ जरा* शोधून पहावे
विहिरीत मनाच्या कधी* वाकून पहावे

संपूर्णसा* इतिहास तपासून पहावे
अडले का* जगाचे कुणा* वाचून ? पहावे !

मारावी* कधी हाक स्वतःलाही* उगाचच
पडसाद तरी येतो* का* ? ऐकून पहावे

प्रतिमेत ‘सहज’ कैद न होईल कधीही
साच्यात सहज कुठल्या*ही* ओतून पहावे

- विवेक काणे 

नोंद:- शेवटच्या शेरात "कुठल्या*ही*" "गालल" म्हणून घेतला आहे. यात "ही" अव्यय आहे आणि तो शब्दापासून वेगळा धरून सुटा एकाक्षरी गुरू म्हणून लघु केला आहे. त्याच्या आधीचा "ल्या" हा कुठल्याच्या शब्दांती येणारा एकाक्षरी गुरू असून लघु घेतला आहे.

या गझलेचे वृत्तबद्ध पठन: - https://www.youtube.com/watch?v=zg88-DvPyIY&t=12s 
या वृत्तातल्या उर्दू उदाहरणांचे पठन:- https://www.youtube.com/watch?v=7nX6Bguf3R8 

प्रश्न:- शब्दांती आणि सुट्या एकाक्षरी गुरूला लघु म्हणून घेता येतो या व्यतिरिक्त मराठीत कोणती लवचिकता घेणे शक्य आहे का? 
उत्तर:- उदाहरण म्हणून माझीच एक गझल घेतो. जिथे भाषेचा लवचिक प्रयोग केला आहे तिथे क्रमांक दिले आहेत आणि त्यांचे तपशील गझलेखाली दिले आहेत. 

वृत्त: गालगागा गालगागा गालगा 

दाखवायला(१) या जगास(२) झगमग तुझी 
वाढवत आहेस(१) किती तू धग तुझी? 

शांत राहण्याचा तुझा तो अट्टहास(३)
वाढवून गेला किती तगमग तुझी

हे कुणाच्या स्वागतास(२) होतेय(४) तयार
देखणी आहे किती लगबग तुझी!  

बाप झाला तू, समज की ती आता 
आई आधी, बायकोये(४) मग तुझी

जर स्वतःची नाहीये(४) किंमत तुलाच(३)
काय करणारे(४) कदर हे जग तुझी?

काय हे? गझलेत उच्चारी वजन? 
मोडणार(१) हेमंत सगळे रग तुझी 

१) क्रियापदांच्या विविध स्वरूपांमधे बऱ्याच शक्यता दडलेल्या आहेत. उदाहरणार्थ "दाखवायला" चे वजन जरी लिपीप्रमाणे "गालगालगा" होते तरी त्याचा प्रचलित उच्चार "दाखवाय्ला" असा "गालगागा" वजनाचा आहे. बरेचदा "गालगागा" मधे बसवायला हा शब्द बदलून "दाखवाया" अश्या स्वरूपात वापरला जातो पण त्याने गझलेची भाषा बोलीभाषे पासून दूर जाते, कृत्रिम होते. म्हणून तसे न करता "दाखवायला" शब्दच वापरून गरज असल्यास त्याचे उच्चारी वजन वापरावे. तसेच "आहेस" शब्दाचा प्रचलित उच्चार "आ-हेस्" असा "गागा" वजनाचा आहे. तर पारंपारिक "गागाल" वजनाबरोबरच "गागा" वजनाचा पर्याय ही उपलब्ध होतो. "मोडणार" हे जरी लिपीप्रमाणे "गालगाल" असले तरी शेवटचा "र" ही अत्यल्प लघु श्रुति आहे आणि तिचे वजन पुढच्या "णा" मधे धरले तर "मोडणार"चा "गालगा" उच्चार करता येतो. काही उदाहरणे पहा. 

१.१) “एल” प्रत्यय असलेले क्रियापदांचे रूप. जमेल (लगा), करेल (लगा), असेल (लगा), म्हणेल (लगा), मरेल (लगा), बनेल (लगा), टिकेल (लगा), बसेल (लगा), पडेल (लगा), नसेल (लगा), आवडेल (गालगा), जाणवेल (गालगा), मानवेल (गालगा) वगैरे --> क्रियापदांच्या या रूपातला शेवटचा "ल" अत्यल्प लघु श्रुती आहे आणि तो पुढच्या गुरू शी घट्टपणे जोडला जातो. पुढच्या व्यंजनाला लागलेल्या ए स्वराचाही अल्प उच्चार होतो. म्हणून त्या "ल" चा लोप करायला किंवा दुसऱ्या शब्दात सांगितले तर "एल"ला एक गुरू म्हणून घ्यायला हरकत नाही. वृत्ताची गरज असल्यास "एल"चे पारंपारिक गाल वजन घ्यायला ही हरकत नाही. अश्या तऱ्हेने वजनाचे दोन विकल्प कवीला उपलब्ध होतात, लवचिकता मिळते. 

१.२) "आयला" प्रत्यय असलेले क्रियापदांचे रूप. बोलायला (गागागा), झोपायला (गागागा), करायला (लगागा), म्हणायला (लगागा) वगैरे --> या प्रत्ययात “य” ही स्वराशी ध्वनी-सामिप्य असलेली अत्यल्प लघु श्रुती आहे. म्हणून या प्रत्ययाचे वजन गागा घ्यायला हरकत नाही. याचे उदाहरण वरच्या गझलेत आहेच. या उलट क्रियापदांचे स्वरूप नसलेला "मायला" (आईला) हा शब्द विचारात घेऊन बघा. याचा गागा उच्चार कर्णकटू होईल.ऑडियो ऐका. 

१.३) "आर" प्रत्यय असलेले क्रियापदांचे रूप. मोडणार (गालगा), करणार (गागा), सजणार (गागा), बोलवणार (गागागा) वगैरे --> या प्रत्ययात शेवटचे "र" अत्यल्प लघु श्रुती आहे म्हणून तिचा लोप करून तिचे वजन पुढच्या गुरूत धरता येते. या उलट क्रियापदांचे स्वरूप नसलेला "बेकार" हा शब्द गागा म्हणून घेतला तर खटकेल. म्हणून क्रियापदां शिवायच्या शब्दांमधे ही सूट घेणे योग्य नाही. 

    ही सूट क्रियापदांच्या बाबतीतच योग्य वाटते. क्रियापद नसलेल्या अन्य शब्दांसाठी अशी सूट घेता येणार नाही. उदाहरण:- "आवडेल" गालगा" वजनात घेता येईल पण तसेच शब्द "तालमेल"किंवा "घालमेल" नाही घेता येणार. त्यांचे वजन "गालगाल"च घ्यावे लागेल. 

२) काही शक्यता विभक्तींच्या प्रत्ययांमधे पण आहेत. उदाहरणार्थ “जगास” चा उच्चार "जगास्" असा होतो म्हणून "स्" चे वजन पुढच्या "गा" मधे धरून "जगास्" चा "लगा" उच्चार करणे शक्य होते. याच पद्धतीने "स्वागतास" चे "गालगा" वजन घेता येईल. अन्य विभक्तींचे प्रत्यय उदाहरणार्थ "त" साठी पण असे करता येऊ शकते. उदाहरण:- जगात(लगा), महालात (लगागा), दुकानात (लगागा), बोळात (गागा) वगैरे.

ही सूट पण विभक्तींच्या प्रत्ययांसाठीच घेता येईल, अन्य शब्दांसाठी नाही. "जगात" चे वजन "लगा" घेता येईल पण "जकात" चे नाही. ते लगाल च घ्यावे लागेल. 

३) ओळीच्या अंती येणाऱ्या लघुचा लोप होतो. ही सूट उर्दू, हिंदी आणि गुजरातीत घेतात. म्हणून अट्टहास चे वजन गालगाल असून ही गालगा म्हणून घेतले आहे. तुलाच चे वजन लगाल असून ही लगा म्हणून घेतले आहे. उर्दू उदाहरण म्हणून दुष्यंतकुमारांचा हा शेर बघा.  

वृत्त:- गालगागा गालगागा गालगागा गालगा 
अब किसी को भी नज़र आती नहीं कोई दरार 
घर की हर दीवार पे चिपके है इतने इश्तहार 

४) मराठीत प्रमाण लेखी भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा जरा वेगळे स्वरूप घेते. याला मी मराठीची "प्रमाण बोली भाषा" असे म्हणतो. उदाहरणार्थ "काम आहे का?" हा प्रश्न विचारतांना "कामे का?" असे बोलण्यात येते. ही भाषा वऱ्हाडी, मालवणी किंवा अहिराणी सारखी मराठीची बोली नसून प्रमाण मराठी भाषेचे बोलतांना बदललेले स्वरूप आहे. म्हणजेच काय तर मराठीला "प्रमाण लेखी भाषा" प्रमाणेच एक "प्रमाण बोली भाषा" पण आहे. तिचा वापर लवचिकतेसाठी होऊ शकतो. उदाहरणार्थ "काय आहे" ऐवजी "काये"  असे ही बोलतात म्हणून गालगागा ऐवजी गागा असा विकल्प उपलब्घ होतो. याचा वापर गझलेत आज ही होतोय आणि तो अधिक प्रमाणात व्हायला हवा. या गझलेत "सजत आहे" ऐवजी "सजतेय", "बायको आहे" ऐवजी "बायकोये", "नाही आहे" ऐवजी "नाहीये" आणि "करणार आहे" ऐवजी "करणारे" अशे स्वरूप वापरले आहेत. हे सर्व स्वरूप प्रमाण मराठी बोलीभाषेत सहजपणे वापरले जातात. 

प्रश्नः- तुम्ही म्हणतात त्या उच्चारी वजन आणि लवचिकतेची मराठी कवि/गझलकारांची उदाहरणे आहेत का? 
उत्तर:- ही उदाहरणे पहा. 

१) पहिले उदाहरण गझलेचे नाही पण संतसाहित्यातून आहे. भुजंगप्रयात मधे निबद्ध "श्री मनाचे श्लोक" यात काही ठिकाणी व्यंजन-स्वर संधी करून वृत्त सांभाळले आहे. हे उदाहरण बघा. 

अनाथां दिनांकारणे जन्मताहे --> "जन्मत आहे" (गागा गागा) या दोन शब्दांची संधी करून त्याचे "चालताहे" असे "गालगागा" घेतले आहे. याच सारखी एक ओळ म्हणजे "जगी बोलण्या सारखे चालताहे" 

ही लवचिकता उर्दू, हिंदी आणि गुजरातीत सर्रास घेतात. 

वृत्त: गालगा गालगाल गागागा 
दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है 
आख़िर इस दर्द की दवा क्या है 

दुसऱ्या ओळीत "आख़िर इस" "गागा गा" वजानाचे आहे पण "आख़िरिस" असा व्यंजनस्वर संधी करून "आ-ख़ि- (र)इस" चे "गालगा" वजन घेतले आहे. 

२) वामनदादा कर्डक यांच्या रचनेंमधे उच्चारी वजन आणि लवचिकतेची काही उदाहरणे सापडतात. सिनेमाच्या गाण्यांच्या चालींवर हिंदी/उर्दूत कव्वाली लिहायची परंपरा त्यांनी जवळून पाहिली होती. त्याच प्रमाणे त्यांनी मराठीत रचना केल्या. म्हणून उच्चारी वजन आणि लवचिकता त्यांच्या रचनांमधे सहजपणे आली. दोन उदाहरणे बघा. 

वृत्त: गाललगागा गागागागा गागालगाल गा 
सांगा* अम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा* धनाचा साठा अमुचा वाटा कुठाय हो?

वृत्त: लगाल गाललगा गालगाल गागागा 
भीमाच्या* ग्रंथा*मधी पाहिला नवा भारत 
तिथेच हाय परी राहिला नवा भारत 

बयेच्या* बा ने* कुठे पाहिला नवा भारत 
दिसेल काय अशा बाई*ला नवा भारत 

प्रश्न:- पण का करायचा एवढा आटापिटा. ज्यांना जमेल ते मराठीतल्या आजच्या मान्य नियमांप्रमाणे गणवृत्तात लिहितील. नाही जमणार ते मात्रावृत्तांमधे लिहितील. कशाला पाहिजे हे उच्चारी वजन आणि लवचिकता? 
उत्तर:- उच्चारी वजन आणि लवचिकतेचा स्वीकार केल्यास सुरेश भटांनी गझलेच्या बाराखडीत जे महत्वाचे दिशानिर्देश दिले आहेत त्यांचे पालन करायला मदत होईल. खालील दोन मुद्दे बघा.

१) गझलेची बाराखडी[२], शेवटी महत्वाचे, मुद्दा-१: "गझल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा." 
--> मराठी शिवायच्या भारतीय भाषांमधे गझलेने भरारी घेतली ती गणवृत्तातच. मात्रावृत्तांचा वापर सीमितच प्रमाणात झाला. गणवृत्ते हाताळताना उच्चारी वजन आणि लवचिकतेचा वापर करण्यात आला म्हणून ती वृत्ते बंधनकारक ठरली नाहीत. याची नोंद मराठी गझलकारांनी घेणे गरजेचे आहे. मराठी गझलेत गणवृत्तांचा वापर वाढवायचा असेल आणि गझलेला मात्रावृत्तांकडे पूर्णपणे वळण्यापासून थांबवायचे असेल तर उच्चारी वजन आणि लवचिकता स्वीकारणे आवश्यक आहे. भाषेच्या या लवचिक प्रयोगाला माधव जूलियन यांनी अशुद्ध मानले. काही अपवाद वगळता त्यांच्या नंतरच्या मराठी गझलकारांनी पण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मराठी आणि उर्दू दोन्ही भाषांमधे गझल लिहिणाऱ्या गझलकारांना उर्दूची ही पद्धत माहीत असूनही त्यांनी ती मराठीत आणण्याचे प्रयत्न केले नाहीत. याचाच परिणाम आहे की भटांच्या सूचनातली "शक्यतोवर गणवृत्तात लिहावे..." मधली मात्रावृत्तांसाठीची पळवाट घेत आज काही प्रस्थापित गझलकार आणि त्यांच्या प्रभावात काही नवीन मराठी गझलकार सर्रास मात्रावृत्तांमधेच गझल लिहिताहेत. 

२) गझलेची बाराखडी[२], शेवटी महत्वाचे, मुद्दा-६: "शेर सहज कळावा आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या थेट हृदयात शिरावा, अशी शब्दाची मांडणी असावी. जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा." 
--> इथे भट साहेबांना फक्त संवादी शैली अपेक्षित होती. त्यांनी संवादी शैलीत पण प्रमाण मराठी भाषेतच गझला लिहिल्या. त्यांनी प्रमाण मराठी बोलीचा उपयोग केलेला नाही. पण संवादी शैलीच्या अधिक जवळ जायचे असेल तर प्रमाण बोली भाषेचा वापर ही मराठीत करू शकतो. याने लवचिकता वाढेल. आधी पाहिल्या प्रमाणे "करणार आहे" ऐवजी "करणारे" आणि "कुठे आहे" ऐवजी "कुठेय" अशी प्रमाण बोली भाषा गझलेत जास्त प्रमाणात यावी. क्रियापदांचे, प्रत्ययांचे प्रमाण बोली भाषेतले स्वरूप उच्चारी वजनात वापरल्याने पण रचनेला मोकळिक मिळेल. वर पाहिल्या प्रमाणे "दाखवायला" हे "गालगागा" म्हणून आणि "जगास" हे "लगा" म्हणून घेता येऊ शकतात. म्हणजेच काय तर "दाखवाया" सारखा बोलण्यात नसलेला कृत्रिम शब्द टाळता येईल. हे सर्व केल्याने "जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा" या विधानाच्या अधिक जवळ जाता येईल. 

उपसंहार:- 
माधव जूलियन यांनी १९३३ मधे "गज्जलांजली" या संग्रहाद्वारे गझल काव्यप्रकार मराठीत आणला. पण तसे करतांना त्यांनी फारसी/उर्दू गझलपरंपरेत नसलेली दोन बंधने मराठी गझलेला लावली. 
१) पहिले बंधन म्हणजे गझलेचे सर्व शेरांचा भाव एक असावा. अशा गझलेला उर्दू मधे मुसलसल गझल म्हणतात पण अशा गझलांचे प्रमाण उर्दूत बऱ्यापैकी कमी आहे. बाकी गझलांमधे प्रत्येक शेरात वेगवेगळे विषय हाताळले जातात. माधवरावांना ते पटले नाही म्हणून त्यांनी हे बंधन लावले. त्यांच्या नंतरच्या गझलकारांनी हे बंधन पाळतच गझला लिहिल्या. विंदां, मंगेश पाडगावकर वगैरे कवींनी हे बंधन पाळले. सुरेश भटांच्या ही "रूपगंधा" मधल्या बहुतांश गझला हे बंधन पाळून लिहिलेल्या आहेत. "रंग माझा वेगळा"  मधे मुसलसल गझलेचे प्रमाण कमी झाले. या नंतर सुरेश भटांचे  प्रसिद्ध झालेले दोन गझलसंग्रह म्हणजे "एल्गार"आणि "झंझावात. त्यातल्या गझला या बंधनापासून बऱ्यापैकी मुक्त आहेत. जेव्हा हे पहिले बंधन झुगारण्यात आणि मराठी गझल उर्दू परंपरेच्या जवळ गेली तेव्हा तिने मोकळा श्वास घेतला. मराठी गझलेत "एल्गार" हा एक महत्वाचा टप्पा आहे. आजचे बरेच गझलकार हा संग्रह वाचूनच गझलेकडे वळले.  
२) माधवरावांनी दुसरे बंधन लवचिकतेवर लावले. त्यांना उच्चारी वजनानुसार भाषेचा लवचिक प्रयोग सदोष- अशुद्ध  वाटला. वृत्तबद्ध कवितेची मराठीत जुनी परंपरा आहे आणि त्याच प्रमाणे गझल पण लिहिली जावी असे त्यांना वाटले. मी नम्रपणे नमूद करू इच्छीतो की त्यांना आणि त्यांच्या नंतरच्या गझलकारांना या लवचिकतेची ताकद समजली नाही. ही पद्धत मराठीत राबवणे तर दूरची बाब आहे या पद्धतीला समजणारे गझलकार बोटांवर मोजण्या एवढेच आहेत. अगदी अलिकडे डॉ. श्रीकृष्ण राऊतांनी २०१८ मधे प्रकाशित झालेल्या गझलकार सीमोल्लंघनाच्या वार्षिक अंकात "गझलांच्या वृत्तातली लवचिकता" या लेखात उच्चारी वजन आणि त्याने येणाऱ्या लवचिकतेची सविस्तर नोंद घेतली. [३] मराठी गझलेत गणवृत्तांचा वापर वाढवायचा असेल तर लवचिकतेचा खूप फायदा होईल असे या लेखकाचे नम्र मत आहे.  

ऋणस्वीकार:- 
हा लेख वाचून तो अधिक परिणामकारक व्हावा म्हणून महत्वाच्या सूचना करणारे डॉ. श्रीकृष्ण राऊत, अमोल शिरसाट आणि शुभानन चिंचकर यांचे धन्यवाद.

संदर्भ : 
[१] "उर्दू व गुजराती गझलचे वृत्त" - डॉ. रईश मनीआर - अनुवाद: हेमंत पुणेकर, गझलकार सीमोल्लंघन २o१४ 
[२] "गझलेची बाराखडी", सुरेश भट, एल्गार, साहित्य प्रसार केंद्र, ८वी आवृत्ती, २०११ 
[३] "गझलांच्या वृत्तातली लवचिकता" - श्रीकृष्ण राऊत, गझलकार सीमोल्लंघन २o१८

4 comments:

 1. उच्चारी वजन या अत्यंत महत्वाच्या तंत्रावर सखोल, अभ्यासपूर्ण लेख. आपले मनापासून धन्यवाद!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद विनोदजी. मी तुमच्या गझला वाचल्या आणि तुम्ही प्रमाण भाषेची लवचिकता आधीच वापरत आहात. या लेखात मी मांडलेले मुद्दे गझललेखनात साहजिकता आणू शकतील. उर्दूत "गझल कहना" असेच म्हणतात. मराठीत अजून आपण गझल लिहितोय. लवचिकता लिहिण्यापासून कहना कडे घेऊन जाऊ शकते.

   तुम्हाला हे मुद्दे पटताय असे वाटते तर एखादा प्रयोग करून बघा की!

   Delete
 2. छान लिहलय सर

  ReplyDelete