एक गझल : एक पुस्तक : फिर संसद मे हंगामा : श्याम पारसकर

                       


                          'फिर संसद मे हंगामा ' : दीर्घ ग़ज़ल. ( एक ग़ज़ल -एक किताब. )


श्री प्रकाश पुरोहित ह्यांची दोनशे पन्नास शेरांचा समावेश असणारी ही दीर्घ गझल; एक पुस्तक - एक गझल. गझलेचे शीर्षक आहे -   फिर संसद मे हंगामा. मागील वर्षी  सीमोल्लंघन - २०१९ या विशेषांकात 'मुहाजिरनामा' ह्या मुनव्वर रानांच्या दीर्घ गझलेच्या परिचयपर रसग्रहणामधे मी प्रकाश पुरोहित यांच्या दीर्घ गझलेची आठवण काढली होती. आठवण ठेऊन वाचली. आवडली. 


ऊंची है दीवार बहुत...और कंटीले तार बहुत

बैठे पहरेदार बहुत...मुश्किल है दीदार बहुत


अपने रिश्तेदार बहुत...रिश्तों का विस्तार बहुत

वैसे तो है यार बहुत....मतलब के दो चार बहुत


                    अशा संवादी शेरांनी गझलेस प्रारंभ होतो. झटकन पकड घेते. बोलत बोलत केव्हा आपणास 'हमने ऐसी ग़ज़ल कही...कहना था दुश्वार बहुत' ह्या दोनशे पन्नासाव्या शेरापर्यंत आणून सोडते कळू देत नाही अशी बोलघेवडी. प्रवाही, अर्थवाही. ही मात्रावत्तातील धारावाही गझल. प्रत्येक शेर स्वतंत्र संवाद साधणारा. तरीही एकसंघ,एकजीव. शायराबाबत सहज मुखातून त्याचेच शब्द निघतात - 'वो ग़ज़लो का जादूगर ... शेर कहे दमदार बहुत'.


         प्रकाश पुरोहित हे अकोल्यातील एका बॅंकेत अधिकारी होते. सध्या वास्तव्य पुण्यात. लेखन,अखिल भारतीय कवि संमेलनांमधे सहभाग, आकाशवाणी, दूरचित्रवाणीद्वारे साहित्याचे प्रसारण असे छंद जोपासत जन्मास आलेल्या त्यांच्या साहित्यकृती - 'वेदना दस्तखत नही करती'(गीत-ग़ज़ल संग्रह),'बादल कैसे चित्र बनाते'(बालगीत संग्रह) ,  कर्फ्यु लगा है'(ग़ज़लसंग्रह). आणि २०१९ मधे प्रकाशित ' फिर संसद मे हंगामा ' हा गझलसंग्रह. त्यास गझलसंग्रह म्हणण्याचे प्रयोजन असे की संपूर्ण पुस्तकभर ही एकच दीर्घ गझल विस्तारली असून प्रत्येक शेर स्वतंत्र कवितेचा आस्वाद देणारा आहे. म्हणून तब्बल दोनशे पन्नास शेरांच्या ह्या दीर्घ गझलेस गझलसंग्रहच म्हणावे लागेल. 


            गझलेचे पुस्तक हातात घेतले,उघडले, नजरेस पडलेला शेर होता....


टी वी के भइ क्या कहने

न्यूज मसालेदार बहुत


                        वाचनात गुंतत गेलो. गझलेची भाषा आजरोजीची. वर्तमानाची. धाराप्रवाही प्रगतीपरक गझलेच्या अनुषंगाने येणारी नव्या पिढीची भाषा.  टी.व्ही,मोबाईल फोनवर स्मार्टपणे बोलली जाणारी. 'टी वी के भइ क्या कहने... न्यूज मसालेदार बहुत. सहज उद्गार . मनास थेट भिडावे अशी बोलकी, संवादी भाषा.  

   चोविसतास अखंड बातम्यांचा रतीब घलणारे टी व्ही न्यूज चॅनेल्स, राष्ट्रीय वाहिन्या म्हणवणा-या, चटकमटक मसालेदार बातम्या देणाऱ्या. बातम्या तरी कशा? हॉट चटपटीत! आज कोण्या सिनेनटीने कोणत्या रंगाचा ड्रेस परिधान केला? किती वाजता काय खाल्ले? काय प्यायली? सोबत कोणकोणत्या नट-नट्या होत्या? पार्टी कुठे फार्म हाऊसवर साजरी झाली? नशेत कोण कोण होते? वस्त्रांची शुद्ध कोणा नट-नटीस होती-नव्हती वगैरे वगैरे प्रकारच्या. मागील दोन तीन महिन्यांपासून अशा रंगीन फिल्मी बातम्यांची संवयच झाली म्हणा सगळ्यांना. आवडीने चाखत माखत त्याच रंगील्या चर्चा, परिसंवाद, वादविवाद, कोण कोणासाठी मेले, मरते, कोण दौलतजादा करतो, कोण कोणाचा पैसा दडपतो, हडपतो...एकुण सारीच ऐश! कोणत्याही टीव्ही चॅनेलवर पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत दिसून येईल. अशा मसालेदार न्यूज आपणही आंबटशौकीनपणाने चघळत असताना आपणास महामारी,दुष्काळ, रोगराईने मरणारी माणसे, कुठे ओल्या तर कुठे सुक्या दुष्काळाने, कर्जफासाने मरणारे शेतकरी यांचा नक्कीच विसर पडतो. शायर म्हणतात- 


 फिर किसान बर्बाद हुआ

फिर मौसम की मार बहुत


पकी फसलपर बेमौसम

बारिश के आसार बहुत


            रुपयाचे अवमूल्यन, खंडप्राय देशातील ,गावागावातील बेरोजगार तरूण, त्यांच्या डोळ्यांमधून घळघळणारी भूक, उद्या चांगले दिवस येतीलशा भाबड्या आशा कवीला अस्वस्थ करतात. कवी लिहून जातो - 


डॉलर चंगा ताकतवर 

क्यों रुपिया बिमार बहुत


भुख लिखी है चेहरोंपर

कुछ चेहरे खुंखार बहुत


अच्छे दिन कब आऐंगे

गावों में बेगार बहुत


उस बेबस बेचारे की

आखों में अखबार बहुत


                आणि वर्तमानपत्रांची आजची दशा काय तर कवी सांगतो -


रेप, डकैती, दुर्घटना

गीला है अखबार बहुत


     कवी सजग आहे. त्यास आत्मभान आहे. समाजभान आहे. संवेदनशील आहे. ज्वलंत सामाजिक समस्या कवीस अस्वस्थ करतात. गझलेच्या शेरा-शेरातून वास्तव प्रकट होते. परंतु कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, जहाल मतांचं विषवमन नाही. अगदी संयत, सौम्य आणि सभ्य अभिव्यक्ती. समस्येकडे केवळ साक्षेपी अंगुलीनिर्देश करणारी. 


मोबाइलपर तीन तलाक

महिलाएँ लाचार बहुत


लवजिहादमे फिर उछली

बाबुलकी दफ्तार बहुत


गो-रक्षा पर चर्चामे

शामिल है मक्कार बहुत


ट्रेने कब्रिस्तान हुई

स्फोट सिलसिलेवार बहुत


आरक्षण की लाइन मे

झुंठे दावेदार बहुत


                    हे सारे प्रश्न आजचे,ताजे आहेत. विशालकाय देशातील कोण्या ना कोण्या राज्यात, कुण्यातरी प्रांतात आजही गदारोळ ऐकू येतो. प्रश्न तेच. प्रांत मात्र वेगवेगळे. आजही ह्या ज्वलंत प्रश्नी कोण्याही प्रशासकास, राजनेत्यास, लोकनेत्यास, विचारवंतास वा प्रजेस ह्या समस्यांची उत्तरे शोधण्यात संपूर्ण यश आलेले नाही. सामाजिक जडणघडण वा घडी विस्कळीत झाली आहे. कविसह प्रत्येकजण आपआपल्यापरिने प्रश्नांचे निराकरण शोधतो आहे. आजचे वर्तमानच ह्या शेरांमधे उमटलेले आढळून येते.

                    कवी लिहून जातो. लिहितांना जी भावस्थिती,परिस्थीती असेल त्यास प्रकट करण्यास शब्द धावून येतात. सहज एखादा शेर उतरतो....


हाथ मिलाने से पहले

करना सोच विचार बहुत


            तेव्हा ही हातमिळवणी फार वेगवेगळ्या अर्थांनी आलेलीच होती. शब्द तेच परंतु गुह्यार्थ,लक्षणार्थ हे स्थिती बदलली,परिप्रेक्ष्य बदलले की नवीन संदर्भ, स्थितीसापेक्ष प्रसरणशील नवनवीन अर्थच्छटा त्यास प्राप्त होतात. उदा. उपरोक्त शेर. आज कोविड संसर्ग काळात ह्या शेराचे म्हणणे काय ते वेगळे सांगण्याची गरजच पडणार नाही. गझलेचे शेर असे कालमान-स्थितीसापेक्ष नवनव्या त-हेने संवादी व अर्थवाही असतात. कोविडमुळे झालेल्या मृत्युंनी सध्या मायबापाच्या मृतदेहास स्पर्शसुद्धा  न करणारी पोटची औलाद उजेडात आणली आहे. जी अंत्यसंस्कार करण्यास तयार नसते. आपली तोंडे व जीव लपवते.अर्थातच कवीने जेव्हा हे पुढील शेर लिहिले तेव्हा आजच्यासारखी स्थिती नव्हती. परंतु या पार्श्वभूमीवर ह्या  शेरांचा विचार करता येईल. माझा मृत्यू कसा असावा, कसा व्हावा या संदर्भात हे काही शेर बघा - 


बाद मौत के पास मेरे

ना हो रिश्तेदार बहुत


गुमनामी की मौत मिले

मौत भी हो खुद्दार बहुत


मैयत मे कुछ दुश्मन थे

गायब साथीदार बहुत


        प्रकाश पुरोहित आपल्या शेरांमधे म्हणी, वाक्प्रचार,सुभाषिते यांचा सहजसुंदर उपयोग करताना दिसून येतात. जसे 'भिंतीला कान असणे' , 'बुडत्याला काठीचा आधार', 'दिव्याखाली अंधार' यांचा वापर बघा किती चपखलपणे झालेला आहे -


चार दिनों के जीवनको

ढाई आखर प्यार बहुत


वो खुदबीनी का मारा

दिये तले अंधियार बहुत


कैसे माने बचने को

तिनके का आधार बहुत


गुरबत मे गीला आटा

है मुश्किल इफ्तार बहुत


खुद से भी बतियाना मत

सुनती है दिवार बहुत


एक अनार बस झोलेमे

और यहा बीमार बहुत  


रस्सी तो जल गई मगर

अब तक बल खनदार बहुत


        सामाजिक असमतोलामुळे सद्यस्थितीस सामान्य माणूस पार ढासळलेला आहे. मोठ्यांपर्यंत परिस्थितीची झळ पोचत नाही. सामान्यजन मात्र भरडून निघतात. रोजच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांसमवेत त्यांची झुंज सुरु असते. ज्या समाजधुरिणांनी लोकांना दिशा दाखवावी आणि लोकांनी बिनदिक्कतपणे ज्यांच्यावर विश्वास टाकावा अशांचे चित्र आणि चारित्र्य दाखविताना कवी लिहितो-


बागबगीचे बातोंमे

मन मे खरपतवार बहुत


तनपर सोना लदा हुआ

है मन मे भंगार बहुत


करनी कर्फ्यूग्रस्त हुई

कथनी के बाजार बहुत


ओहदा उंचा है लेकिन

ओछा है किरदार बहुत


    आपल्या लोकशाहीत खरा राजा म्हणजे जनता. प्रजा. सामाजिक विषमतेपायी ही प्रजाच नागवली जात  आहे. जनतेचे साधेसुधे जगण्या- मरण्याचेसुद्धा अधिकार हिरावल्या जात आहेत. लोकशाहीदत्त ह्या अधिकारांचे वास्तव शायर असे नोंदवतो - 


कहने भर को जनताके

है मौलिक अधिकार बहुत


सच सुलीपर रोज चढा

झूठ के पैरोकार बहुत


सोलह आने झूठ पे खुश

सच पे हाहाकार बहुत


गुंगे बहरे के आगे

प्रश्नोकी बौछार बहुत


बातों से बू आती है

वादे खुशबुदार बहुत


                    समाजाच्या जीवावर पोसल्या जाणा-या परजीवी बांडगुळांची एक जमात आहे, ती म्हणजे बाबा, बुवा, बापू, मां, अम्मा, माता वगैरे. संख्येने उदंड आणि वृत्तीने उद्दंड अशी ही जमात उच्च सभागृहाच्या वेल पासून ते जेलपर्यंत सर्वत्र आढळून येते. त्यावर भाष्य करताना कवी म्हणतो - 


 बाबाओंके क्या कहने

उनके कारोबार बहुत


     पिठामिठापासून तो जीवनदायी औषधांपर्यंतचे सर्व उद्योगधंदे ह्या बाबा मंडळीने काबीज केलेले आहेत. काय त्यांचे कारभार वर्णावे ! तऱ्हेतऱ्हेचे. कोणी राजकिय दलाल. कोणी मंत्री ठरवतो. कुणाला मंत्र्याचा दर्जा तर कुणी स्वतःच मंत्री. केवढी अजब ही किमयागारी ! आणखी काय सांगावे? काय काय सांगावे? प्रत्यक्षात सांगता येण्यासारखे कमीच. न सांगण्याजोगेच जास्त असे त्यांचे एकूण उद्योग.

   काही सत्ये अल्पकालिन असतात तर काही सार्वकालीन. ह्या सत्याचे कवीला आकलन असते. कारण कवी द्रष्टा असतो. तो बघतो.  शब्दात बिनचूक नोंदवतो. अशा नोंदी गतकाळाचे सिंहावलोकन करण्यास भाग पाडतात. वर्तमान उघड्या डोळ्यांनी बघावयास भाग पाडतात आणि भविष्यात सुद्धा असेच घडत राहील का ही चुटपुट मनास लावून जातात. सत्तेच्या साठमारीत सर्वोच्च सभागृहात चर्चेऐवजी होणा-या धुमाकूळ, गोंधळ, आदळआपट पासून तो हाणामारी पर्यंत पोहोचणारा धिंगाणा कवीला उद्विग्न करतो. कवी विषण्णतेने लिहीतो -


प्यादों के बहकावे में

वादो की सरकार बहुत


फिर संसद मे हंगामा

फिर जूतम पैजार बहुत


भूल गये आदर्शोको

आज के बरखुरदार बहुत


            अशा तऱ्हेच्या ह्या नोंदी. नोंदवणारे दोनशे पन्नास शेर. ह्या शेरांचा अंतर्भाव असणारी ही एक गझल 'फिर संसद मे हंगामा'. त्या गझलेच्या पुस्तकाचे शीर्षक 'फिर संसद मे हंगामा' याच नावाने कश्यप पब्लिकेशन, गाजियाबाद प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. प्रकाश पुरोहित या शायराचे हे पुस्तक मी वाचले. मला आवडले. तुम्ही वाचले तर तुम्हाला सुद्धा आवडू शकते.

..........................................

श्यामनाथ पारसकर

1 comment: