१.
वेगळा वारसा घेतला
वेदनेचा वसा घेतला
अर्थ होता निराळा तुझा
पाहिजे मी तसा घेतला
मी रिकामा परतलो कुठे ?
मी धडा छानसा घेतला
फार अंधारले भोवती
आत मी कवडसा घेतला
घेतला फक्त अंदाज मी
काय सांगू कसा घेतला
लागला खूप भांडू जुना
मग नवा आरसा घेतला
फेकले मी हिरे माणके
ठेवुनी कोळसा घेतला
२.
कितीतरी आघात विसरलो
जगण्याच्या नादात विसरलो
प्रेम, जिव्हाळा, नातीगोती
हे सारे शहरात विसरलो
दोष तसा माझाही होता
मी माझी सुरुवात विसरलो
वचन दिलेले आयुष्याला
काळाच्या ओघात विसरलो
पुनर्जन्म झालाही असता
टाकायाची कात विसरलो
३.
वाटले, ते मी जगाला बोललो
वावगे नाही कुणाला बोललो
शक्यता साऱ्याच पडताळून बघ
हेच मी माझ्या मनाला बोललो
हातचे राखून नाही ठेवले
मी नको ते आज त्याला बोललो
ये मला भेटायला तू एकदा
प्रश्न झालो, उत्तराला बोललो
तोकडी उंची तुझी माझ्यापुढे
खूप काही हिमनगाला बोललो
मी कुणाला बोल नाही लावला
कैकदा अंतर्मनाला बोललो
माणसाळू, बघ तुला जमलेच तर ...
आतल्या, मी श्वापदाला बोललो
खूप रडला ऐकुनी माझे कथन
काय मी त्या पावसाला बोललो ?
ऐकले नाही कुणीही फारसे
वाटले मग, मी कशाला बोललो
............................................
निशांत पवार
चांगल्याच आहेत...
ReplyDeleteप्रेम जिव्हाळा नाती-गोती
हे सारे शहरात विसरलो
हे मनाला त्रास देणारे चित्र खेड्यापाड्यातूनही दिसून येते आहे.
कोरोनाने तर नातीच संपवुन टाकली