चार गझला : अमित वाघ

 

१.

मीच यावे का तुझ्या दारी विठोबा
तूच ये आता तुझी बारी विठोबा

बघ.. तिच्या प्रेमात झालो आंधळा मी
ती कधी होणार गांधारी विठोबा

मी कधी कोणापुढे झुकणार नाही
एवढी कर माफ लाचारी विठोबा

एवढे आलो पुढे की देव झालो
मी कसे फिरणार माघारी विठोबा

वास्तवाला एवढे सुदृढ केले
पाडला गतकाळ आजारी विठोबा

तू कशाला घेत नाही कर्ज कुठले
देव 'काही' कर्जबाजारी विठोबा

एक म्हातारा तुझ्या वारीत मेला
वाट बघते एक म्हातारी विठोबा

मी विटेवरती उभा झालोय आता
एकदा करुनी पहा वारी विठोबा

२.

मंदिरातली भीड शहाणी
की दगडाची चीड शहाणी

असह्य करते जगणे माझे
एक आठवण दीड शहाणी

मच्छर गाजावाजा करतो
पिते रक्त गोचीड शहाणी

स्वैर वाहतो सुटा तराफा
बांध संयमी शीड शहाणी

किडा शहाणा धौशीचा की
दबणाऱ्याची कीड शहाणी

३.

दूर माणसे करते सडकी
फार चांगली असते कडकी

हवी तेवढी लाव आग तू
शीतल तितकी बनते मडकी

एक दिवस ठरलेला असतो
असे इमारत म्हणते पडकी

विझण्याआधी दिवा फडफडे
तुला एकदा भरेल धडकी

फुर्सतमध्ये बनली दुनिया
मीच एकटा तडकाफडकी

अपुली एक्झिट असेल हसरी
असो भलेही एंट्री रडकी

४.
व्यथेला आपली म्हणतो
उन्हाला सावली म्हणतो

किती संतापते आई
विठूला माउली म्हणतो

किती तू खेळतो नशिबा
स्वतःला बाहुली म्हणतो

नसे हा दोष चपलीचा
भ्रमंती चावली म्हणतो

पकडली चूक जर त्याची
परीक्षा घेतली म्हणतो
......................................
 
अमित वाघ

4 comments:

 1. छान गझला अमित! तिसरी विशेष आवडली.

  ReplyDelete
 2. व्वा! चारही गझला उत्तम.. अभिनंदन💐💐

  ReplyDelete
 3. फारच सुंदर .

  विठोबा भावला

  ReplyDelete