तीन गझला : बदिऊज्जमा बिराजदार

 

१.

हळूच भेटून ते म्हणाले, जगायचे बघ तुझ्याचसाठी
भिऊ नको रे मला म्हणाले, लढायचे बघ तुझ्याचसाठी

कुणा म्हणू मायबाप माझे, इथे उत्तरे मला मिळेना;
अशीच आहे अजीब दुनिया, राहायचे बघ तुझ्याचसाठी

तशीच होती कथा व्यथांची, पुन्हा पुन्हा तू नको विचारू;
गळून गेली कितिक स्वप्ने, हसायचे बघ तुझ्याचसाठी

असेच आहे नशीब खोटे, खुळ्याप्रमाणेच शोधताना;
भले असू दे बुरे असू दे, सजायचे बघ तुझ्याचसाठी

जरी सुखाच्या इथे न बागा, उगाच समजावतो मनाला;
फुलाप्रमाणेच फूल जैसे, फुलायचे बघ तुझ्याचसाठी

अता इथे कोण आपुले रे, नको नको जिंदगीच वाटे;
तनामनाने कठोर येथे, बनायचे बघ तुझ्याचसाठी

हसून झाले रडून झाले, असेच साबिर म्हणावयाचे;
असेल चिंता तरी तुला रे, निजायचे बघ तुझ्याचसाठी

२.

यातनांच्या अशा दाट गर्दीस या, मी खुशीनेच कवटाळले! 
चंद्रताऱ्यातल्या जिंदगीला पुन्हा, रोज स्वप्नात कुरवाळले!!

संविधानातही एकनिष्ठा नसे, हक्क मागू कुणाला इथे;
न्यायदानातले पारडे आंधळे, न्याय देताच रक्ताळले! 

ना सुखाचा सडा माझिया अंगणी, अंतरी वादळांचा जुलुस;
प्राक्तनांची व्यथा कामनांची कथा, सांगता लोक चवताळले!

राग आला मला स्थापितांचा जरी, चाड आहे भल्याची कुठे;
पाहिले चेहरे बंडखोरीतले, अन् स्वतःलाच सांभाळले! 

गार वाऱ्यात गंधाळला मोगरा, सोबती आसवांचा सडा;
स्तब्ध आहे उभा गोठता अंतरी, शब्द ओठात घायाळले! 

नेमका प्रश्न त्यांचा कळेना तरी, शोधतो उत्तरांना सदा;
बेगडी रोजची पोक्त औदार्यता, बेगडी रोजची वादळे! 

सूडबुध्दीत का भावना जन्मली, पाहुण्या सारखी साबिरा; 
सागरी लाट आली तिथे ही बघा, काठ पेल्यात फेसाळले! 

३.

जगून घे जरा जरा!
फुलून घे जरा जरा!!

समोर आरसा तुझ्या...
नटून घे जरा जरा!

अजून दुःख यायचे;
हसून घे जरा जरा!

वळीव हा उन्हातला; 
भिजून घे जरा जरा!

सुमार हा दुपारचा;
पडून घे जरा जरा!

नशा जरी पिण्यामध्ये;
जपून घे जरा जरा!

रुसून नीज यायची;
निजून घे जरा जरा!

बदल सवतःमधे प्रथम; 
करून घे जरा जरा!

न शब्द आठवायचे;
लिहून घे जरा जरा!

ढळू नयेत आसवे;
पुसून घे जरा जरा!

चिता विझेल तोवरी;
जळून घे जरा जरा!

जिणे शिकायचे तुला;
मरून घे जरा जरा!

बुडायचेच शेवटी;
तरून घे जरा जरा!

अखेर जिंकणार तू;
हरून घे जरा जरा!

न फार बोलणार ती...
कळून घे जरा जरा!

करायचेच स्नान ना?
मळून घे जरा जरा!

पुन्हा न लाड व्हायचे; 
छळून घे जरा जरा!

सराव चालला तुझा;
चुकून घे जरा जरा!

फकीर साबिरास तू;
स्मरून घे जरा जरा!
.....................................

बदीऊज्जमा बिराजदार 
(साबिर सोलापुरी)

5 comments:

  1. तीनही रचना मस्त.

    मिळेल ज्ञान जेवढे
    दळून घे जरा जरा

    ReplyDelete
  2. तीनही गझला अप्रतिम आहेत.. छोटा बहर.. 👌👌💐💐

    ReplyDelete