दोन गझला : काश्मिरा पाटील

 

१.

काळजातल्या हव्या हव्याशा त्रासावरती गझल लिहावी 
गालावरुनी ओघळणा-या पाण्यावरती गझल लिहावी 

किती देखणे असते अंतर प्रतिक्षा नि त्या प्राप्ती मधले
अंतरातल्या मंतरलेल्या भासावरती गझल लिहावी 

कधी न भेटे कृष्ण तरीही तिने करावे आत्मसमर्पण 
माधवसाठी मीरेच्या त्या ध्यासावरती गझल लिहावी 

दिवस रात्र ती जागत जाते हवे नको ते पाहत जाते 
बाळासाठी आईच्या या जगण्यावरती गझल लिहावी 

फिरत राहते सदा जिंदगी कधी न थकता पोटासाठी 
भूक भाकरी भवती फिरत्या आसावरती गझल लिहावी 

तुटले तुटले म्हणता म्हणता तुटले नाही गहिरे झाले 
या नात्यातिल चिवट रेशमी  धाग्यावरती गझल लिहावी 

स्पर्शाने तव व्हावे चंदन अन श्वासांंचे व्हावे अत्तर 
तुला पाहता  दरवळणार्या श्वासांवरती गझल लिहावी 

होते जेव्हा दुःख अनावर अलगद येते ती ओठांवर 
चोरपावली गझलेच्या या येण्यावरती गझल लिहावी 

२.

जीवनाचा पसारा किती 
सावल्यांचा सहारा किती 

सांजवेळी मनी काहिली
देहभर हा शहारा किती

कृष्ण राधा कसे भेटती
या जगाचा पहारा किती

नाम जपते तुझे मी सदा
आठवांचा दरारा किती 

जीवना रूप गोंडस तुझे
लोचनी हा निखारा किती

 .........................................

काश्मिरा पाटील,
नंदुरबार

4 comments: