१.
तिच्या नि माझ्या कडून झाला
गुन्हा खूपदा करून झाला
दोघांसाठी दोघांचाही
देहभाव मग विकून झाला
मी देहाच्या घरात शिरलो
सुरू तमाशा तिथून झाला
सत्तेच्या हातून नेहमी
शेतकऱ्याचाच खून झाला
मृत्यूचा तो फॉर्म कधीचा
जन्मासोबत भरून झाला
मुळातला निर्गुण बिचारा
भक्तीसाठी सगूण झाला
चुकू नये बेरीज म्हणूनी
तुझा हातचा धरून झाला
२.
हे कसे उलटेच कोडे नेहमी तू घालते
दूर जाण्यानेच का हृदयात येते वाटते
माकडाच्या सारखे वागायचे तर वाग तू
आरसा उलटा धरुनही बिंब सुलटे राहते
प्रश्न आणी उत्तराचाही जरा अंदाज घे
सांग अंधारास का तलवार कोठे कापते?
तू नको अग्नीस लावू शिस्त मूर्खा, सारखी
ज्योत अग्नीची सदोदित ऊर्ध्वगामी धावते
अजुनही मजला कळेना काय होते नेमके?
आठवण येताच कैसी रोज उचकी लागते
३.
पेटवा, पण त्यास जळता येत नाही
आणि आकाशास मळता येत नाही
मेनका नाचेल वा नाचेल रंभा
पण तुकारामास चळता येत नाही
जोवरी जाते फिरत नाहीच तोवर
एक दाणा त्यात दळता येत नाही
देह आणी मन मळाचे नाव आहे
फक्त हृदयालाच मळता येत नाही
दंड साधूच्या जरी देहास देशिल
साधुच्या आत्म्यास छळता येत नाही
लाभला हा वळण रस्ता छानसा पण
मन वळेना म्हणुन वळता येत नाही
ऊन आहे पूर्व पश्चीमेस तोवर
सावलीपासून पळता येत नाही
४.
दुःखाच्या पाढ्याचाही वानोळा होतो
आठ दुणेचा गुणाकार मग सोळा होतो
जिथुन निघालो तिथेच का येऊन पोचतो?
असा कसा हा रस्ताही वाटोळा होतो
हे दुःखाचे विश्वरुप पाहुन झाले की,
माझ्यामधला अर्जुन चोळामोळा होतो
झूल फक्त पांघरतो आहे जरा देखणी
जखमांसोबत रोज साजरा पोळा होतो
गलबलून हुंदका जरासा फुटतो तोवर ;
तोंडामध्ये दुःखाचा मग बोळा होतो
कितीतरी जिंकलो जगाशी युद्ध आजवर ;
स्वत:शीच लढतांना का पाचोळा होतो
...............................................
कमलाकर आत्माराम देसले
सगळ्याच गझला खूप वेगळ्या आणि आशयसंपन्न आहेत आबा
ReplyDeleteमर्मभेदी गझला.. अप्रतिम आबा🙏
ReplyDeleteसर्व गझला अप्रतिम
ReplyDeleteव्व्वाह! खूप सुंदर आबा!
ReplyDeleteव्वाह....खूप सुंदर
ReplyDelete