दोन गझला : रमेश सरकाटे

 

 
१.
 
सुग्रास जेवतो मी भीमा तुझ्या मुळे
लाखात खेळतो मी भीमा तुझ्या मुळे

नेसावयास होती बापास लक्तरे
बघ सूट नेसतो मी भीमा तुझ्या मुळे

राहावयास होती तुटकीच झोपडी
माडीत राहतो मी भीमा तुझ्या मुळे

मा बाप काम करण्या होते उन्हात ते
एसीत झोपतो मी भीमा तुझ्या मुळे

झुकवून मान चाले त्यांच्या समोर बा
ऐटीत चालतो मी भीमा तुझ्या मुळे

पायास फोड होते बापास चालता
मोटार फिरवतो मी भीमा तुझ्या मुळे 

तू संविधान दिधले देशास आपुल्या
हक्कास जाणतो मी भीमा तुझ्या मुळे
 
२.
जरा मी श्वास घेतो तर सजा देऊ म्हणाले ते 
इथे मी राहण्याचा कर सदा घेऊ म्हणाले ते 

मनूच्या संहिते जैसे तुला लागेल वागावे 
गुलामा सारखे मजला इथे ठेऊ म्हणाले ते 

हुकूमाची इथे सत्ता अता तर आमची आहे 
जिथे आम्ही तुला सांगू तिथे नेऊ म्हणाले ते 

जरी का वल्गना खोट्या तयांच्याही  किती असती
पुन्हा येईन मी सांगून मज येऊ म्हणाले ते 

नको मागू इथे काही तुला मिळणार ना काही 
कधीही संगतीने तू नको जेऊ म्हणाले ते
..................................... 

रमेश सरकाटे

1 comment: