चार गझला : चंदना सोमाणी

 

१.
अंधारावर मात शिवाजी
एक नवी सुरवात शिवाजी

उंचावरचा चंद्र सांगतो
जिती जागती रात शिवाजी

मावळचा हा गडी रांगडा
मानत नाही जात शिवाजी

शत्रूला हमखास भेटतो
प्रत्येकाच्या आत शिवाजी

सह्याद्रीच्या कडेकपारी
दिशादिशांना ज्ञात शिवाजी

भोळ्याभाळ्या रयतेसाठी
पाठीवरचा हात शिवाजी

स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती
'अरमानोंकी बात ' शिवाजी 

असाल जेथे दिसेल माझा 
या साऱ्या विश्वात शिवाजी

२.

वेडावतो मनाला वारा क्षणाक्षणाला 
नसतो मनास तेव्हा थारा क्षणाक्षणाला 

प्रेमात पावसाचा असतो कुठे भरवसा 
पडतात त्यात काही गारा क्षणाक्षणाला 

स्वातंत्र्यगान जर का ओठांवरी तुझ्या तर
का बांधतोस मग तू कारा क्षणाक्षणाला 

का आरशास भासे चर्या अनोळखीशी
उडतो अता अताशा पारा क्षणाक्षणाला

समजून घेतली मी आत्ताच लोकशाही 
खातात लोक तेही चारा क्षणाक्षणाला

जर भेटलाच आहे सहवास सागराचा
होतोच मग किनारा खारा क्षणाक्षणाला
 
३.
 
तुझ्या सारखी मी तुला सांग ना तू
मला नाव माझे फुला सांग ना तू

किती दोन डोळ्यातले हेलकावे
किती पापण्यांचा झुला सांग ना तू

जरा मोकळ्या कर मनातील लाटा
विचारात कसल्या मुला सांग ना तू

कशी भूल पडली अशी सोहळ्यांची
कुठे आज तो चौफुला सांग ना तू

मिळू दे नव्याने मला वेदनाही
जुना बंध आता खुला सांग ना तू

४.
 
हारलेला डाव चल मांडू नव्याने
सोड ते भांडण जुने भांडू नव्याने

जीवनाचे रंग कोऱ्या कागदावर
आज शब्दांनी पुन्हा सांडू नव्याने

गेम दे सोडून सारे नेटवरचे
खेळ खेळू चल विटीदांडू नव्याने 

कोण म्हणते सांग ना आहे नवी ती
तीच आहे वेस ओलांडू नव्याने

गाठताही येत नाही तळ मनाचा
भोवरा होऊन भोवांडू नव्याने

उखळ आहे पण तरी मग का दिसेना
दुःख माझे मी कसे कांडू नव्याने 

चांदणे पेटून उठले जर कधी तर
प्रेम देऊ त्यास, ओसांडू नव्याने
......................................

 चंदना सोमाणी

7 comments:

  1. अप्रतिम गझला... मनापासून अभिनंदन💐💐

    ReplyDelete
  2. चमचमणारे शब्दांगण...... सतेज, निर्भेळ आणि सर्वोत्तम..... 👌😊👌

    ReplyDelete
  3. चमचमणारे शब्दांगण...... सतेज, निर्भेळ आणि सर्वोत्तम..... 👌😊👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम गझल -'शिवाजी'...
    माझाही एक अधिकचा शेर--
    "महान राजा विश्वामाजी
    स्वराज्याचा स्त्रोत शिवाजी"

    ReplyDelete
  5. -अशोक म.वाडकर

    ReplyDelete