१.
दहशतीचा दूत आला एक छोटासा विषाणू
हादरे देतो जगाला एक छोटासा विषाणू
गाव शहरे ओस पडली पांगल्या बाजारपेठा
कैद करतो माणसाला एक छोटासा विषाणू
शेकडो देशात लाखो जीव घेऊ लागला तो
घेरतो आहे तुम्हाला एक छोटासा विषाणू
झुंड ही तैयार आहे माणसे मारावयाला
फक्त तो डोक्यात घाला एक छोटासा विषाणू
संगणक उकरून करतो नेमकी लंपास गुपिते
फोर जी चा नेटवाला एक छोटासा विषाणू
संशयाने एकमेका पाहती हा कोण आहे
धर्म ना पुसतो कुणाला एक छोटासा विषाणू
२.
आजाराचा धाक दाखवा,पैसे उकळा
हेच नवे अभियान चालवा,पैसे उकळा
करा खरेदी जंतूरोधी द्रावण, मुसके
त्वरीत विक्रीशॉप थाटवा, पैसे उकळा
परवान्याने करू चाचण्या खोट्यानाट्या
खास वेगळी लॅब चालवा ,पैसे उकळा
धुंडाळावे सगळ्या पॅथीत इलम तिलस्मी
उपचाराचा वेग वाढवा, पैसे उकळा
आजीच्या बटव्यात शोधुनी काढा औषध
लवकर बाजारात पाठवा, पैसे उकळा
'अमुच्यायेथे खात्रीलायक इलाज होतो'
जाहिरातिचे ढोल वाजवा, पैसे उकळा
३.
विठोबा बंद झालेले तुझे ते दार आहे का?
तुझ्यावाचून आम्हाला कुठे आधार आहे का?
नको उपकार आम्हाला नको रे कोरडा सल्ला ;
म्हशीच्या दोन शिंगांचा म्हशीला भार आहे का ?
पसंती कळविण्याआधी खुलासा एवढा व्हावा ;
किराणा औषधी अथवा मुलाचा बार आहे का ?
तुझ्या पोटास घालू पण कदर कर शेतमालाची ;
परस्पर भाव करण्याचा तुला अधिकार आहे का ?
प्रभू नाकी नऊ येती महामारी तुफानाने ;
प्रजेला तारण्यासाठी नवा अवतार आहे का ?
चुको ना दे हरी वारी कधी आषाढ कार्तिकी ;
उरो ना रोग कोरोना असा उपचार आहे का ?
४.
निधीचा आकडा मोठा,बसेना कागदोपत्री
नजर अंधूकली का रे दिसेना कागदोपत्री
गहाणी शेतकर्जाच्या फसावे कास्तकाराने
चतुर ही बॅन्कसेवा बघ फसेना कागदोपत्री
किती रोगी बरे झाले, घरी गेले,किती मेले
खरा अहवाल अद्यावत असेना कागदोपत्री
पुसेना कोणी कोणाला कसे झाले कुठे वाटप
कुणीही येथ हिमतीने धसेना कागदोपत्री
धुऱ्यांना कोरुनी झाला जमीनीवर तुझा ताबा
तुझी वहिवाट चालू दे नसेना कागदोपत्री
...............................................
श्याम पारसकर
अकोला
Chaan
ReplyDeleteचारही रचना खूपच सुंदर.
ReplyDeleteविठोबा विशेष भावला
चुको ना दे हरी वारी कधी आषाढ कार्तिकी
हा मनाची आर्तता व्यक्त करणारा शेर खूपच भावला.