पाच गझला : अल्पना देशमुख - नायक


 
१.

अगोदर वाटले जितके सरळ साधे
अतीशय खोल होते घाव शब्दांचे

दिले बदलून तू कित्येकदा औषध
तुला कळलेच नाही मूळ रोगाचे

अता होणार नाही ताप डोक्याला
बरे झाले स्वतःशी तोडले नाते

हसत राहील जे काट्यातही कायम
मनामध्ये असावे फूल एखादे

दिसेना एक मैलाचा दगड येथे
कुठे नेतील या डोळ्यातले रस्ते

नदी होणार आहे कोरडी यंदा
कसे जगवायचे पाण्यातले मासे

शिकवता येत नाही सूर शब्दांना
स्वभावातच असावे लागते गाणे

२.

माझ्या तुझ्यात देवा इतकी दरी कशाला
हृदयात ये रहाया ती पंढरी कशाला? 

लपवून ठेवले मी जे पान केतकीचे 
फिरतो सुगंध त्याचा वा-यावरी कशाला?

नुकतीच ठेवली मी दुःखे जरा उन्हाला
आल्या अशा अवेळी वेड्या सरी कशाला? 

सांभाळता न आले होते तुझे तुला ते
आरोप त्या गुन्ह्याचा माझ्यावरी कशाला?

उरली सजावटीची कुठलीच हौस नाही
साधीच वेदना दे ही भरजरी कशाला ?

३.

राखते आहे जगाचा मान मी
आजही आहे किती नादान मी 

शांततेची दाट झाडी भोवती
एकटीने पार केले रान मी

उलटले होतेस तू घाईत जे 
वाचताना राहिलेले पान मी

वेदने तू बोल ना काहीतरी
हा पहा केला जिवाचा कान मी

टाळले होतेस तू कायम तिला
वाट आहे एकटी सुनसान मी

वंचना वाट्यास आली नेहमी
त्यामुळे झाले अशी धनवान मी

फक्त नाही ध्वज तुझ्या हातातला
मी तुझी ओळख तुझा अभिमान मी

४.

आठवते ओझरते काही
खोल कुठेसे हलते काही

सांगितली मी इच्छा साधी
मागितले का भलते काही? 

नवीन ही सुरूवात परंतू
जुने पुराने स्मरते काही

तुला पाहिले तेव्हा पासुन
काळजात दरवळते काही

तुझी आठवण म्हणून जपले
घाव जुने भळभळते काही

तुझ्याच विषयी लिहित राहते
बाकी कोठे सुचते काही

बोलुन गेल्यावर सांगितले
मनात माझ्या नव्हते काही

 नाव तुझे ओठांवर यावे
असे अचानक घडते काही

कुठेतरी पालवते आशा
उगाच वाटत नसते काही

५.

पुढे चालून जगता येत नाही
तुला विसरून जगता येत नाही

तुझी ही आठवण झाली नकोशी
तरी सोडून जगता येत नाही

हुबेहुब चित्र आहे भाकरीचे
तिला पाहून जगता येत नाही

जगाशी रोज खोटे बोलते मी
खरे बोलून जगता येत नाही

चुका स्वीकारणे असते हिताचे
चुका टाळून जगता येत नाही

कणा कणखर असा आहे मनाचा
नजर झुकवून जगता येत नाही

अता तर तूच माझा श्वास गझले
तुला वगळून जगता येत नाही
.......................................

अल्पना देशमुख - नायक

1 comment:

  1. सर्वच गझला उत्कृष्ट

    माझ्या तुझ्यात देवा इतकी दरी कशाला
    हृदयात ये रहाया ती पंढरी कशाला?
    खूप छान
    तुमचा हा पुढला शेर त्यालाच लागू पडावा अशाही दृष्टीने पाहता येतो

    तुझ्याचविषयी लिहित रहावे
    बाकी कोठे सुचते काही

    ReplyDelete