पाच गझला : शुभानन चिंचकर

१.
सारखी चाहूल मी घेऊन बघतो 
कोण दिसते का पुन्हा वाकून बघतो

भोवताली गोठलेली सुन्नता मी 
बाल्कनीमध्ये उभा राहून बघतो

हे कशानेही भरत नाही रितेपण
व्यर्थ माझा जीव मी ओतून बघतो

हालते काहीतरी टीव्हीत म्हणुनी
रोज तासनतास कंटाळून बघतो

खूप दिवसातून व्हिडिओ कॉल येतो
फोनच्या मी बंद खिडकीतून बघतो

ती म्हणत बसते तिन्हीसांजेस स्तोत्रे
मी दिवे अश्रूतले जाळून बघतो

काय करण्याजोगते नसतेच रात्री
फॅन घरघरता कधीपासून बघतो

वाटते चिंता मुलींची... बायकोची
झोपल्या आहेत ना... जागून बघतो

'अरुण' येईलच नवी घेऊन किरणे
खूप आशेने उद्याचे ऊन बघतो

२.

कुठून आलो हेच विसरले जाते
पुढे सर्व जगणे भरकटले जाते

टोकावरती एकटेच उरतो, मग
टोकाचे पाऊल उचलले जाते...

उभारणीचा काळ युगांचा असतो
मात्र क्षणातच जग विस्कटले जाते

मोत्याचे दिसतात दिसाया दाणे
पण शेवट आयुष्य भरडले जाते

नसेल जर सुदृढ नाते देठाशी
फूल फुंकरीनेच विखुरले जाते

आभाळच निर्माण करावे अपुले
भरारीस जर का डावलले जाते

३.

रडू यावेच दरवेळी... गरज नसते
लढत राहू... हताशेची गरज नसते

कुपीमध्ये मनाच्या पोचतो अलगद
सुगंधाला समीक्षेची गरज नसते...

करू शकतेच की रसपान चिमणीही
हवी मैना पळसवेडी... गरज नसते

अशी माझ्यामधे तल्लीन होते की
तिला माझी अशावेळी गरज नसते

कड्याहुन झोकुनी देतो नदीसाठी
झर्‍याला तर तहानेची गरज नसते

प्रयोजन संपले की बंधही गळतो
पुढे बाळास नाळेची गरज नसते

हवासा पैल त्या डोळ्यांमधे दिसतो
जिथे जाण्यास नावेची गरज नसते

असे जमतात काळे ढग मनामध्ये
कडा असतील सोनेरी... गरज नसते

दरीखोर्‍यातला मी तर खुला वारा
दखल घेतील पंखे ही गरज नसते

४.

रहायची इच्छा तर नव्हती मात्र राहिलो
हळूहळू रुजलो, मग आमूलाग्र राहिलो

मशागतीचे तंत्र हेपलत तज्ज्ञ राहिले
अन् मी हंगामात सुगीच्या व्यग्र राहिलो

डिटर्जंटची कुठल्या ही नव्हती पुण्याई
माझ्या नीती-मूल्यांनी मी शुभ्र राहिलो

उथळ मनांनी खळखळ केली दखल घ्यायला
संथ प्रवाही, शांत, खोल मी पात्र राहिलो

पापभिरू मध्यमवर्गी बुजरा होतो मी
गुन्हेही जरी केले, अदखलपात्र राहिलो

रंगवले पण प्रत्यक्षात उतरले नाही...
मी कोणाच्या स्वप्नामधले चित्र राहिलो

परिस्थितीने डोळे अपुले उघडले खरे
जागे तेव्हा किती रात्रबेरात्र राहिलो...

भरून आल्याची नाही जाहिरात केली
आतच बरसुन मी बाहेर निरभ्र राहिलो

५.

शिवुन दे फक्त तू काखेमधे बाही
तशी ब्रा ची तिला सध्या गरज नाही

नको तू पाठवू पोरीस कामाला
जवळ आलीय बोर्डाची परीक्षाही

कसा वैरी अजुन पाऊस थांबेना
कधीची चूलसुद्धा पेटली नाही

हवेमध्ये फिरवते बॅट नसलेली
बघत पोस्टर ‘मिताली राज’ वा ‘माही’

मिटुन डोळे कधी काश्मीरला जाते
घरी पत्र्यात नाही होत मग लाही

मिळत नाही जिथे पाणीच हप्ताभर
कसा मिळणार तेथे स्वच्छ कपडाही

कुबट भिंतीमधे कोंडायची घुसमट
विचारायास नसतो येत वाराही...

- शुभानन चिंचकर


No comments:

Post a Comment