१.
स्वच्छ हृदयाचे झरे आहोत आपण
आपल्यापुरते बरे आहोत आपण
आपल्याला डोह होता येत नाही
फक्त वरचे भोवरे आहोत आपण
माणसाचे लेकरू निष्पाप असते
मग कुणाची लेकरे आहोत आपण ?
ज्या घरी ओलांडल्या कित्येक इच्छा
त्या घराचे उंबरे आहोत आपण
सौख्य आले की जवळ येतात सगळे
दु:खितांचे सोयरे आहोत आपण
ज्या दुधाचा कोणताही धर्म नाही
त्या दुधाची वासरे आहोत आपण
२.
नेहमी डोळ्यात पाणी ठेवतो
त्यामुळे ओंजळ उताणी ठेवतो
स्वप्न म्हणते त्याच व्यक्तीला दिसू
जो उशाला चार नाणी ठेवतो
सोडुनी जातोच पक्षी शेवटी
फक्त झाडावर निशाणी ठेवतो
बाप जगण्याचे धडे देतो मला
पण स्वतः चे मन अडाणी ठेवतो
दोन मिस-यांचीच आहे जिंदगी
त्यात मी अवघी कहाणी ठेवतो
............................................
एजाज शेख,
अमरावती
दोन मिसऱ्यांची जिंदगी...
ReplyDeleteसुंदर .
आला सास गेला सास
जिवा तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं
दोन सासाचं अंतर