दोन गझला : सौ.गौरी ए.शिरसाट


१.

स्वप्नात काल रात्री येऊन कोण गेले 
गंधाळल्या क्षणांना छेडून कोण गेले

आहे बघा सुखी मी कसलेच दुःख नाही
पदरात या सुखाला ठेवून कोण गेले

हास्यास माळले मी माझ्या मुखावरी या,
ही बातमी जगाला सांगून कोण गेले!

दुःखास आळवावे कित्येकदा असे मी
हृदयास घाव वर्मी देऊन कोण गेले?

आता नको नव्याने देऊ अजून काही,
गौरीस भेटलेले घेऊन कोण गेले!
 
२.
तू दिलेल्या यातनांना पाळते आहे
पोटच्या पोरांपरी सांभाळते आहे

मोकळी होती मनाची कोणती दारे
दुःख म्हणुनी उंबरा ओलांडते आहे
 
शोध का मज लागला नाही तुझा कोठे
आठवांना मीच माझ्या चाळते आहे

राहिले ना भय कशाचेही मला आता
मी रुढींच्या बंधनांना तोडते आहे

सप्तरंगी रंगली आभा तुझी होती
त्यात माझा रंग कुठला शोधते आहे

नेहमी देतोस तू हुलकावणी मजला
भेटण्याचे मीच आता टाळते आहे

छंद जडला मज तुझ्या प्रीतीत रमण्याचा
रोज म्हणुनी मी नव्याने भाळते आहे
 
.......................................................

सौ.गौरी ए.शिरसाट
मुंबई;

No comments:

Post a Comment