१.
सांगणे हे जिवाचे किती आत आहे.
रेशमी चांदणे त्या लिफाफ्यात आहे.
हासणे ,बोलणे ,सोबतीला रहाणे
आणखी वेगळे काय दोघांत आहे?
मारली तू मिठी ही जिवाची जिवाला
बातमी का तिची चारचौघात आहे!
मी शिलालेख समजून कोरीत गेलो
का तुझे बोलणे फक्त ओघात आहे.
कस्तुरीगंध येतो तुझ्या अक्षरांना
राहसी कोणत्या तू मुलूखात आहे?
श्वास माझे तुला मी असे दान केले
सांग ना वादळावर कशी मात आहे?
२.
तोडले मी चौकटींना; पाळली रितभात नाही.
जिंकतांना काळजाला पाहिली मी जात नाही.
मांडता का कुंडली त्या प्रेमिकांची दांभिकांनो,
चंद्र,तारे,सूर्य ,वारे - काय त्या दोघात नाही?
वार होते ते फुलांचे झेलले इतक्या खुबीने,
घाव नाही कोणता अन् कोणता आघात नाही.
मंदिरी येण्यास मजला काय बंदी घालतो तू?
जोखण्याची पात्रता मज कोणत्या देवात नाही.
हे खरे की जे हवे ते घेतले कमवून मीही
बघ नशीबा...तुज पुढेही पसरला मी हात नाही.
खूप होती रोषणाई अंगणी वृद्धाश्रमाच्या
त्या बुढ्या डोळ्यात काही पेटली ती वात नाही.
दाटला काळोख आहे भोवताली संसदेच्या ,
जागता ठेवा पहारा झिंगण्याची रात नाही.
...............................................
डाॅ.विजयालक्ष्मी वानखेडे
'महू 'श्रीकृष्ण नगर,
चिखली रोड,
सुंदरखेड,बुलडाणा
भ्रमणध्वनी 9922521938
No comments:
Post a Comment