दोन गझला : विशाल मोहिते पाटील



१.
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.. कुठून आणू..?
तुला पाहिजे तसाच वारा... कुठून आणू..?

चित्र पाहुनी मूल म्हणाले वास्तव दावा
बाई अन डोक्यावर भारा...कुठून आणू..?

तिचे नि माझे गणित कधीही जुळले नाही
तरी मागते हिशेब सारा ...कुठून आणू..?

आठवणींची नशा कधीही उतरत नाही
मिळेल सुटका असा उतारा... कुठून आणू..?

वाढवले तू इच्छांचे आभाळ केवढे
रोज रोज मी तुटता तारा ...कुठून आणू..?

२.

फकीर पाहुन दार घराचे उघडत नाही
घरात त्याच्या दौलत आहे दानत नाही!

लायक आहे मनगट माझे अजून देवा
मंदिरात मी म्हणून काही मागत नाही!

जसा वागतो तसा कुणीही बोलत नाही
जसा बोलतो तसा कुणीही वागत नाही!

जखमा अपुल्या कुणी कुणाला नका दाखवू
कुरतडती, पण मलम कुणीही लावत नाही!

मी आईला सगळी दुःखे सांगत बसतो
आई मजला कधीच काही सांगत नाही!

पाउस हल्ली लहरी माणुस होतो आहे
पाउस आता पावसापरी वागत नाही!

त्या रस्त्यावर उगिच काळीज का धडधडते
हल्ली ती तर गावामध्ये राहत नाही!

सामावुन ब्रह्मांड असावे त्याच्यामध्ये
थांग मनाचा म्हणून कोणा लागत नाही!

एक असा मी कधीच भक्ती सोडत नाही
एक अशी ती मला कधीही पावत नाही!
.............................................................

विशाल मोहिते पाटील

No comments:

Post a Comment