दोन गझला : कविता डवरे

 

१.

कोणता झाला कहर हा ? क्रुद्ध झाली माणसे ! 
जात , धर्माच्या  शराने   विद्ध  झाली  माणसे !

 चूड कोणी लाविली तर पेटले वणव्यापरी
 मत्सराने  ग्रस्त  झाली, युद्ध झाली माणसे !

जीवनाचे  सार कळले ज्या क्षणी त्याला तसे
कृष्ण- नानक अन् महम्मद - बुद्ध झाली माणसे ! 

माणसाचा स्पर्श होता बाटली होती  किती 
मंदिरी जाता  खरे का  शुद्ध  झाली  माणसे  ?

ताकदीने मनगटाच्या जिंकले तू अंबरा
पण  स्वतःशी  झुंजताना वृद्ध  झाली  माणसे !

 २.

प्रत्येकाच्या  व्यथा  वेदना , त-हा  निराळी !
प्रत्येकाच्या  घरी  सारखी  कुठे  दिवाळी ?

स्तुती , प्रशंसा  नाही  केली  कबूल  आहे ,
कुणी कधीही  करू आपली  नये टवाळी !

टोळीमध्ये  सामिल  होणे  जमले  नाही
आणि कुणाची नाही करता  येत कुचाळी
 
बालपणीचे  दिवस  कोवळे   हवेहवेसे !
शेतात जणू पोषक सात्विक पिके हिवाळी !
  
जरी चालतो  मनात  माझ्या विवाद रात्री...               
तरी  मुखावर  नित्य  ठेवते  हास्य सकाळी !

कमावती   स्त्री  घरात  असते  शेतावाणी
ओलितातली  खुंटत   नाही  जशी  हराळी !
.........................................

कविता डवरे 'निती',
अमरावती, 444604
मो. 9623327478

1 comment:

  1. टोळीमध्ये सामील होणे जमले नाही... मस्त

    ReplyDelete