दोन गझला : स्वप्निल शेवडे

 

१.

ओळख अश्या जगाशी झाली
आयुष्याची काशी झाली

असे काय झाले हसायला
भेट तुझी कोणाशी झाली

चूक भूतकाळाची होती   
भविष्यास का फाशी झाली? 

जुनेच होते सारे मुद्दे
चर्चा वैतागाशी झाली

जरी हटकली तरी परतली
तुझी आठवण माशी झाली

इंद्रधनू घटनांचे स्मरले
सरींत भेट उन्हाशी झाली

२.
 वाटला सर्व ध्यास वरवरचा
आजवरचा प्रवास वरवरचा

फार होते कठीण तो रडणे
तो न होता उदास वरवरचा

लागले ठोस शून्य हाताशी
बास आता तपास वरवरचा

काय आहोत चंट आपणही
विषय नेतो धसास वरवरचा

अंत ना ह्या गटारगंगेला
तू तुझा हा सुवास वरवरचा

छान आहे नवीन टॉप तुझा..
छान झाला विकास वरवरचा
............................................

स्वप्निल शेवडे
पुणे

No comments:

Post a Comment