तीन गझला : आत्तम गेंदे



१.
कधी भगवे शमत नाही, कधी हिरवे शमत नाही...
तिरंगी एकदा सुद्धा इथे वादळ उठत नाही...

स्वतःला सिद्ध करण्याची असावी लागली चिंता...
तिच्या नवजात बाळाला बघा जावळ दिसत नाही...

सदा घाईत असते ते, जवळ क्षणभर बसत नाही...
सुखाला लावुनी लोणी कधी मी थांबवत नाही.. 

तिचे माझे प्रणय वर्णन कवीची कल्पना आहे
मला ती ओळखत नाही तिला मी ओळखत नाही...

स्वतः उजळून भीमाने मिटवली रात्र कायमची 
मिळाला सूर्य दुनियेला कधी जो मावळत नाही

नराच्या ऐवजी नारळ असावे मान्य सर्वांना...
म्हणुन प्रत्येक वेळेला बळी बोकड असत नाही...

तिला पुसले खरे कारण..."गझल का आवडत नाही ?"
गझलच्या सारखी कोणी, म्हणे दुसरी सवत नाही..

२.
जात, धर्म, वंशाचा जेव्हा जागर झाला
साधा भोळा माणुस सुद्धा कट्टर झाला

तुमच्या आधी प्रयोग हा माझ्यावर झाला
औषध म्हणून चक्क विषाचा वापर झाला

माझे मरणे आधी केवळ अशक्य होते
माझा म्रुत्यू निश्चित जन्मानंतर झाला

फार खुबीने आधी खोटे बोलत होता
सत्यवान तो एका प्याल्यानंतर झाला

माझ्यापूर्वी फार उंच जो वाटत होता
किती ठेंगणा तो मी आल्यानंतर झाला

सन्मान म्हणू की त्याचा हा अपमान म्हणू ?
प्रसिद्ध येथे गुरूच चेल्यानंतर झाला...

कुणी मारले नसते तर तो मेला असता
अजरामर तो त्याच्या हत्येनंतर झाला

३.
बोलतो आहेस तू जे तेच तोही बोलला..
"मीच आहे चांगला रे, मीच आहे चांगला.."

भांडलो आपण पुन्हा त्या मांजरांच्यासारखे..
घास ताटातील अपुल्या, माकडाने लाटला

माणसाला पाहुनी 'माणूस' झाली श्वापदे...
कोणता माणूस सांगा माणसासम वागला?

लाच देणारा कशाला नोट पाहुन हासला..?
भरवश्याचा एक साक्षीदार त्याला भेटला

फार होती गझलियत अन् छान होता राबता..
दोन मिसरे भांडले अन् एक मतला संपला...
...................................................
 
आत्तम गेंदे

1 comment: