लोककवी वामनदादा कर्डक यांच्या दहा गझला

 


 


१.

कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले 
तन मन तुलाच माझे आले शरण म्हणाले

कोटी उपास पोटी धरिलेस तूच पोटी 
झाले तुझ्या कुळाचे शुद्धीकरण म्हणाले

जळणे दिव्याप्रमाणे नाही तुझे फुकाचे
गौतम तुझ्यात आहे मज त्रिसरण म्हणाले

जीवनकथा गुरूची गाथा लिहीत होते 
सरला प्रवास आता माझे चरण म्हणाले

ओटीत गौतमाच्या घालून सात कोटी 
चल झोप शांत आता माझे सरण म्हणाले

वामनसमान माझ्या चिमण्या चिल्यापिलांनो 
तारील मी तुम्हाला एकीकरण म्हणाले


२.

आला पहाटवारा, गेला पहाटवारा
आला पुन्हा ऊन्हाचा चटक्यांचा तोच मारा

जुलुमा तुझीच करणी जाळी दलितधरणी 
करपे तुझ्या गुणाने माझा समाज सारा

लेखून हीन याती केलीस काल माती 
धर्मा तुझ्या कृतीने केलाय कोंडमारा

वारा निघून गेला, थारा नसे आम्हाला 
सुकवील कोण आता, डोळ्यामधील धारा

वामन नव्या दमाने माझ्या भीमाप्रमाणे 
उपजेल का रे कोणी जुल्मास जाळणारा

३.

मी राखीत आलो भीमरायाचा मळा 
ते चाखीत आले गोड गोमट्या फळा

मी पेरीत आलो ठायी ठायी लळा 
ते कापीत आले माणुसकीचा गळा

ते खुशाल फिरती गळ्यात घालून गळा 
का इथे आम्हाला या जुलमाच्या झळा

का नदी निराची वहातसे खळखळा 
का डोळे कुणाचे ओघळती घळघळा

हा वामनवानी तळातला पांगळा 
का इथे बिचारा कापतसे चळचळा

४.

तो भीम जसा लढला तो लोक लढा लढवा 
जा ठायी ठायी जा माणूस नवा घडवा

हा उंच पदी आहे तो नीच पदी आहे 
या नीच प्रणालीला जा सुळावर चढवा

जा चातुर्वर्ण्याची चिरफाड करा आता 
हा वर्णवाद सारा चिखलात आता सडवा

जा शिखरावरती जा क्रांतीची गाणी गा
हा क्रांतीचा गाडा जा शिखरावर चढवा

जा बुद्ध फुले सांगा जा आंबेडकर सांगा 
जा वामनवानी जा इतिहास नवा घडवा

 
५.


भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे 
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे

उपाशी जीव जे कोटी तयांची भूक भागावी 
अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे 
 
निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्यासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे

भुमी ती भीमरायाची तुझ्या हाती आता आली 
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे

तुझी निष्ठा तुझे जीवन तुझी श्रद्धा भीमावरची 
नसावी नाटकी वामन खरे बलिदान मागावे


६.

माळावरची माती बोले आज मळ्याच्या मातीला 
फुगवू नको गं तू गर्वाने फुगवू नको गं छातीला

मी हलकी तू भारी असला गर्व तुला का आला गं 
पाणी नसता राहील का गं मान तुझ्या या जातीला

सकलासाठी प्रकाशणारी उजळी धरणी सारी जी 
अशीच भारी साथ असावी आज दिव्याच्या वातीला

कधी कुणाचे गळे न कापी तलवारीच्या धारीने 
अशीच येथे धार असावी तलवारीच्या पातीला

काल भीमाने तुकडे केले मनुस्मृतीच्या सापाचे 
उगीच आता भिऊ नका रे या सापाच्या कातीला

तथागताची करुणा व्हावी वामनवानी संसारी 
तथागताचा नातू बोले तथागताच्या नातीला
 
७.


इथे लढला तिथे लढला कुठेही ना कधी पडला
कुठे घडला की ना घडला इथे इतिहास हा घडला

गुलामी जाळण्यासाठी सलामी देत असताना
नगारा भीम क्रांतीचा रणासाठी रणी झडला

असो गोरा असो काळा नेमका नेम धरणारा
भीमाचा बाण सुटलेला कुठेही ना कधी अडला

कुणाच्या भाकरीसाठी कुणाच्या चाकरीसाठी
उपाशी माणसासाठी रणी रणधीर तो लढला

जरी ना पाहिला गाता तरी वामन परी आता 
भीमाच्या पाऊली सारा जिव्हाळा हा असा जडला
 

८.

नांदी तुझ्या पथाची दीक्षाभूमी तुझी
झाली तथागताची दीक्षाभूमी तुझी 

माणूस पेरणारा पाउस पडे इथे
झाली तुझ्या मताची दीक्षाभूमी तुझी 

सद्धम्म सांगणारे साऱ्या जगातले
सारेच ग्रंथ वाची दीक्षाभूमी तुझी

वामन तथागताच्या दीक्षाभूमीवरी
झाली उभ्या जगाची दीक्षाभूमी तुझी
 
९.

त्या भीम माउलीला लाखात पाहिले मी
जयगान माउलीचे लाखात गाईले मी

नागांचि नाग नगरी दीक्षेस पात्र होती
तेथेच दोन रात्री जाऊन राहिले मी

एक फूल काळजाचे एक फूल भावनांचे
एक फूल या मनाचे लाखाते वाहिले मी

गेली हजार वर्षे नव्हता मनात हर्ष 
मसनातल्या मनूचे आघात साहिले मी

नरकातले जीणे ते नरकात फेकले मी
बुद्धा तुझ्या शीलाच्या, सिंधूत न्हाइले मी

वामन समान सारे काळे गळून पडले 
हृदयात पौर्णिमेचे एक रोप लाविले मी

 १०.

भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो
तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो 

तू रांगलास जेथे तेथेच मान झुकली
ती धूळ मी कपाळी लावून काल आलो

आई तुझी भीमाई सातारलाच गेली
तेथेच दोन अश्रू वाहून काल आलो

जाऊन दूर देशी तू आणली शिदोरी
मी त्यातलीच काही खाऊन काल आलो

दिल्लीतला खजिना तू वाटणार होता
तेथे तुझेच पाणी दावून काल आलो

दीक्षाभूमी सभोती हर्षाने दाटलेली
नागांचि नाग नगरी पाहून काल आलो

ते जाळणार होते मी टाळणार होतो
वामन सहीत तेथे जाऊन काल आलो 

........................................... 

लोककवी वामनदादा कर्डक
संग्रामपिटक - (संपादक : प्रमोद वाळके) मधून साभार 


No comments:

Post a Comment