तीन गझला : राहूल गडेकर


१.
हात सैल जर सोडला समज 
भार आणखी वाढला समज 

मिटून डोळे शोध खोलवर 
तळ हाताला लागला समज 

आस सोबतीची असली तर
क्षण एकाकी भेटला समज 

कणा मोडला म्हणण्यापेक्षा
गरजू व्यक्ती वाकला समज 

अंग चोरले असे लगोलग 
चोर स्पर्शही हेरला समज 

स्पष्टपणे जर सांगितले तर
गैरसमजही वाढला समज 

तिला सोडले तिच्याचसाठी
हा प्रेमाचा दाखला समज 

किती प्रशंसा करू तुझी मी 
एकदातरी तू मला समज 

२.
 
गोडवा रिचवण्याची नाही सवय मला 
एवढ्या कौतुकाची नाही सवय मला 

चुकून घडते हातून कधी जरा बरे 
सारखे गिरवण्याची नाही सवय मला 

तिचे चोरले असेन मी मन, नसेनही
स्वतःस तपासण्याची नाही सवय मला 

लावले कपाळी मी.. ते चंदन झाले 
उगाळीत बसण्याची नाही सवय मला 

स्तब्ध पाहुनी हासत आहे परिस्थिती 
असहाय प्रसंगाची नाही सवय मला 

येईल परत, ते मन माझे असेल तर 
समजूत काढण्याची नाही सवय मला 

तिची आठवण येता मनात गुणगुणतो 
विरह गीत गाण्याची नाही सवय मला 

रडता येते उघडपणे तर मग भेटू
जोकरास बघण्याची नाही सवय मला 

हरकत नाही, मी जर कळलो नाहीतर 
हातास लागण्याची नाही सवय मला 

३.
व्यस्त स्वतःला ठेवत आहे बिनकामाच्या कामांनी 
आज स्वतःला मारत आहे हाक अनामिक नावांनी 

पदर पकडता आला नाही कधी बरोबर अर्थाचा 
अर्थ लागला समजू तेव्हा क्रम पालटला शब्दांनी 

मर्यादांच्या वेढ्यांमधले दिवस बरे होते आधी 
वाट लावली स्वतःच अपुली वेढवून पर्यायांनी 

सुटला पट्टा तोंडाचा की ह्या दुनियेचे मालक ते 
त्यांच्या नाका खालून सदा जोर पकडला चर्चांनी 

तिला आठवत असेलही का भेट राहिली शेवटची
एक आठवण वाट पाहते चिंच भारल्या हातांनी 

जीव ओतला एकूण एक पान भरवतांना आधी  
नंतर सुकला पाचोळाही खेळवला पारंब्यांनी 

लिहण्यापेक्षा फिरत राहतो अरण्य एकांताचे मी 
मना आतले कंपन टिपले पानांवर रातकिड्यांनी 

माझ्यामध्ये मूर्ख केवढे मला माहिती नाही पण 
मिळून ओळख मला दिलेली माझ्या मधल्या मूर्खांनी 
...............................................
 
राहूल गडेकर

1 comment: