दोन गझला : अब्दुल लतीफ़१.
अपुल्या मनाची आसही वेलीप्रमाणे वाढते 
आधार मिळतो जेवढा, ती तेवढी फोफावते 

गेलो असा पकडायला की दूर संधी धावते
नाही मला मिळणार तर ती दार का ठोठावते

एका तिरावर घर तुझे, दुसर्‍या तिरावर घर तिचे
अन जात नावाची नदी दोघात तुमच्या वाहते

पडले मला हे स्वप्न अन मग मोगरा गंधाळला
"ती कालची विधवा अता केसात गजरा माळते" 

भाषेस नसतो रंग, ती वसते अशी सार्‍यांत, की 
ती ठेवते रोजा कधी, श्रावण कधी ती पाळते 

चिमण्यांस कळते फक्त एका तान्हुलीचे जेवणे 
ती जेवताना घास का.... बाजूस अर्धा सांडते

बघता तिचे नाकारणे , पडतो पुन्हा प्रेमात मी 
नाकारते जर ती मला, तर का अशी नाकारते
 
२.
जिंकायचे आहेच तर पचवा मला 
अपमान माझा बोलला परवा मला 

मनसोक्त रडण्याची जरा मिळते मुभा 
तेंव्हा ढगांनो एकदा भिजवा मला 

काहीतरी उपयोग माझा होवु द्या 
फेकून देण्याऐवजी कुजवा मला 

काहीच का नाही सुचत त्यांच्याविना 
याचे कुणी उत्तर तरी सुचवा मला 

नाही अजुन सुद्धा कळालो मी मला 
कळलो कधी कोणास तर कळवा मला 

मी मानवाचा अंश, हे लक्षात घ्या 
नंतर म्हणा भगवा, निळा, हिरवा मला 
...............................

अब्दुल लतीफ़


1 comment:

  1. मी मानवाचा अंश हे लक्षात घ्या...
    अप्रतिम

    ReplyDelete