तीन गझला : सौ. कविता शिरभाते

 

१.
 
स्वार्थी जगात सांगा वागायचे कसे ?
टाळून माणसांना चालायचे कसे ?
  
दु:खात आसवांना हासून टाळले
ह्रुदयातले उसासे दाबायचे कसे ?

सुर्यासमान जाळी पोटास भूक ही
चंद्रास भाकरी मी मानायचे कसे?

मातृत्व लादले अन् नाकारलेस तू
गर्भास अंतरी मी मारायचे कसे

नजरेत माणसांच्या पाहून वासना
आयुष्य ह्या कळ्यांनी काढायचे कसे?

काटेच रोज माझे असतात सोबती
मी रेशमी फुलांवर भाळायचे कसे?

हे दार काळजाचे नाजूक वाटते
येणे तुझे सख्या मी टाळायचे कसे?

४.

आम्हांस प्रिय अमुची भाषा असे मराठी
जनताजनार्दनाच्या हृदयी वसे मराठी

शब्दांमधून कोट्या आणिक विनोद येता
ओठांवरी जणांच्या तेव्हा हसे मराठी

बाणा तिचा निराळा आहे  मराठमोळा
मिंधी कुणापुढेही माझी नसे मराठी

गाथा, अभंग, दोहे, कविता, गझल, रुबाई
प्रत्येक या विधेला शोभुन दिसे मराठी

भाषा कशी असावी येतो सवाल जेव्हा
तेव्हा जगास दावी ही आरसे मराठी
           
५.

नाश होतो जीवनाचा मीपणाने आजही  
जिंकले आहे जगाला संयमाने आजही

हुंदके दाबायचे अन् आसवांना प्यायचे
का जगावे बायकांनी दीनवाणे आजही

खाचखळग्यांनी अडवले आजवरती शेकडो
 शोधला रस्ता तरीही निर्झराने आजही

वाकुनी किंचित खुबीने, मी लढाई जिंकली
हार मग  मंजूर केली, वादळाने आजही

घेतला गळफास नंतर, कर्जमाफी लाभली 
केवढे उपकार केले शासनाने आजही

राहिली होती सुखाच्या कल्पनेने कोरडी
ती खरी समृद्ध झाली संकटाने आजही

अंतरीचा देव नाही पाहिला आयुष्यभर
 देव पाषाणास केले माणसाने आजही

संकटांना लादणारे मित्र सारे भोवती
वादळांना पेलण्याची जिद्द आहे आजही
...............................................
 
सौ.कविता मंगेश शिरभाते
यवतमाळ
मो 9834138001
  

5 comments:

  1. वाह! तीन ही गझला अप्रतिम👌

    ReplyDelete
  2. तीनही गझला सुंदर.

    केवढे उपकार केले शासनाने आजही

    विदारक सत्य

    ReplyDelete
  3. तीनही रचना सुंदर

    केवढे उपकार केले शासनाने आजही

    विदारक सत्य

    ReplyDelete