१.
खरी जिंदगी त्या शिवारात आहे,
जिथे माय माझी दिमाखात आहे!
नका दोष देऊ तिच्या कापडाला,
खरी घाण तुमच्या विचारात आहे!
कसा काय देऊ दगा मी तिला रे,
जिचे प्रेम मजवर अतोनात आहे!
नको ज्ञान सांगू मला आज चंद्रा,
तुझे संपणे जर... उजेडात आहे!
शिखर गाठतांना, कुणीही यशाचे,
सवय ओढण्याची, पिढीजात आहे!
नको थांबवू तू तुझी चाल आता,
मजा जीवनाची प्रवाहात आहे!
जगी विठ्ठलाचा नको शोध घेऊ,
खरे तर विठोबा,तुझ्या आत आहे!
२.
हाक देतो आतला आवाज आयुष्या,
शोभला आहे तुझ्यावर ताज आयुष्या!
लाख दे तू संकटे पदरात माझ्याही,
होत नाही मी कधी नाराज आयुष्या!
कोणतेही कष्ट करताना मला त्याची,
वाटली नाही कधीही लाज आयुष्या!
आतला कल्लोळ नाही पाहिला माझ्या,
फक्त त्यांनी बांधला अंदाज आयुष्या!
वार झेलूनी मनावर माफ करण्याची,
खाजवावी मी किती ही खाज आयुष्या!
शांत व्हावे वाघिणीने पाहता मजला,
जीवनाला दे असाही साज आयुष्या!
नेहमी मदतीस माझा हात लागावा,
मागणे इतकेच आहे आज आयुष्या!
.......................................
धनाजी जाधव, तुळजापूर..
(7020264980)
दोन्ही गझला सुंदर
ReplyDeleteविठोबा ...❤