तीन गझला : गजानन वाघमारे

 

१.

प्रेम तिने केल्याच्या काही नोंदी होत्या
माझ्या गझला तिच्या निरंतर ओठी होत्या

फाशी घेता घेता त्याने दोर फेकला
आठवले की, घरी उपाशी चोची होत्या

चेहऱ्यावरी छान दयेचे अस्तर होते
रक्तामध्ये लपुन घृणेच्या पेशी होत्या

दोषी नव्हते मुलगी होवुन तिचे जन्मने
परंपरा ह्या बुरसटलेल्या दोषी होत्या

घाबरायचा बलात्कार झाल्याचे ऐकुन
नंतर कळले, त्याच्या पोटी पोरी होत्या

डोक्यामध्ये फक्त जन्मतः मेंदू होता
नंतर नंतर देव, धर्म अन् जाती होत्या

२.

दिसायाला तुझे डोळे नितळ होते
तरी डोहात त्या बुडणे अटळ होते

घरी शेती तथा उपवर मुली होत्या 
पुरावे आत्महत्येचे सबळ होते 

तुला धरले जमेला एवढे चुकले
तुझ्या वाचुन गणित साधे सरळ होते

मला मी वाचवू शकणारही नव्हतो
तुझ्या मेंदूतले कावे चपळ होते

तुझे संभ्रम,तुझी स्वप्ने,तुझे धोके
जगायाला पुरेसे पाठबळ होते

बुडाला घाण होती अंतरात्म्याच्या
जगाचे चेहरे वरवर उजळ होते

अखेरी जिंदगी भेटावया आली
कितीसे श्वास हे माझ्याजवळ होते

३.

तुझी गल्ली, तुझा पत्ता, तुझे घर सापडत नाही 
तुझ्या शहरात आलो पण तुला भेटू शकत नाही 

इथे वैफल्यग्रस्तांच्या कशा वस्त्या उभ्या झाल्या ?
सुखाचा चेहरा लावुन कुणी माणुस दिसत नाही 

तुला काही कळत नाही असे सांगायची तेव्हा 
मला इतकेच कळले की मला काही कळत नाही

सुचू लागायच्या पुर्वी कथा,कविता,गझल,ओव्या 
मला सुचतेस आता तू, पुढे काही सुचत नाही 

करू आपापल्या जागी सुखाचे छान देखावे 
नको तूही रडू तेथे, इथे मीही रडत नाही 

मला हे सत्य पटले की, असावी भूक मृत्युंजय
कितीही पाहिली मारुन तरी मरता मरत नाही
................................................

गजानन वाघमारे
कष्टसाध्य निवास,
सराफा लेन, प्रभाग ९,
महागाव जि. यवतमाळ

2 comments: