तीन गझला : संदीप जाधव



१.
 
रोजचे आहे मना हे आजचे नाही
ह्या पुढे वेड्यापरी वागायचे नाही

का विचारत थांबला आहेस तू रस्ता
जर तुला गावाकडे त्या जायचे नाही

रोज मिळते पुरणपोळी गोड दुःखाची
पण मिळू शकले सुखाचे लोणचे नाही

हाच होता उत्तरांमध्ये फरक अपुल्या
राखले माझ्याकडे मी 'हातचे' नाही 

मी तिला असतो विचारत रोज नजरेने 
'हो' कधी होणार आहे कालचे 'नाही'

तू जवळ केलेस परके दूरदृष्टीने
पण तुला दिसले कधी का जवळचे नाही

शेवटी मी काळजावर लावली पाटी
'आत या त्यांनीच ज्यांना जायचे नाही'

२.

सांगणे तू बंद कर ही कारणे बेचव मला
कीव येते ऐकल्यावर सारवासारव मला

दोन प्याले ह्यामुळे आहेत अर्धे राहिले
एक म्हणतो, "भर मला"; दुसरा म्हणे, "संपव मला"

बंद कर आता तरंगत ठेवणे डोळ्यांमध्ये
सोड तू काठावरी वा तळ तुझा दाखव मला

एवढे कर जर तुला माझी गरज नाहीच तर 
फक्त जाताना परत माझ्याकडे सोपव मला

मानतो विश्वासघाताचे तूझ्या आभार मी
आज दाखवलेस तू दुनियेतले वास्तव मला

जन्मभर देईन खात्रीशीर परतावा तुला
एकरकमी एकदा श्वासांमधे गुंतव मला

वेड शेवटच्या म्हणे टप्प्यात आहे पोचले
डॉक्टरांनी हात वर केलेत, ये, वाचव मला
 
३.
गळ्याभोवती आवळणारा फास थांबवा कुणीतरी 
ती आल्याचा होणारा आभास थांबवा कुणीतरी

मोगऱ्यास "तू नकोस उमलू", अशी एकतर ताकिद द्या 
किंवा माझा कायमचा हा श्वास थांबवा कुणीतरी

पायरीवरी देवाघरचे फूलच उघडे आहे तर 
देवळातली कोटींची आरास थांबवा कुणीतरी 

भुंग्यांपासुन वाचवणारा काटा रडताना म्हटला
फूल तोडुनी नेणाऱ्या  हातास थांबवा कुणीतरी 

पृथ्वी म्हणते नको माणसा करू काळजी माझी तू 
माणुस व्हा अन माणुसकीचा ऱ्हास थांबवा कुणीतरी

तुला विसरले आहे का मी यावर भिडली दोन मने 
एकाला थांबवतो मी दुसऱ्यास थांबवा कुणीतरी 

तिने काय मागितले नक्की विचारले पाहिजे मला  
विझण्याआधी तुटणाऱ्या ताऱ्यास थांबवा कुणीतरी
 
..............................................

संदीप जाधव

No comments:

Post a Comment