१.
ध्येय तू बदलू नको पण वाट तू बदलून घे
अन् मनाची ठेचसुद्धा एकदा झटकून घे
जर जगाची व्यस्त वर्दळ रोज भुंकू लागली
तर मनामध्येच वेड्या मोकळे नाचून घे
शुद्ध ती शांतीअवस्था जर मनाला पाहिजे
बुद्ध तू होशील आधी युद्ध तू समजून घे
पाकळ्यांनीही फुलाला धाक दाखवला असा
जीव ओघळण्याअगोदर जीव ओवाळून घे
काळजाच्या अत्तराला प्रेमउचकी लागली
वेड 'कित्ती गोड' आहे लाघवी लाजून घे
२.
का नष्ट माणसांचा हा भोग होत नाही
मुर्तीस जेवणाचा उपयोग होत नाही.
मुर्तीस जेवणाचा उपयोग होत नाही.
पाहून जांभईला केला कुणी खुलासा
संसर्गजन्य आहे पण रोग होत नाही
चुंबन जरी तनाचे लोकांस भोग वाटे
मन चुंबिले कुणी तर उपभोग होत नाही
नाती अनोळख्यांशी सहजी जुळून येती
मुद्दाम जुळवले तर संयोग होत नाही
हट्टी जरी विनंत्या प्रेमात मान्य झाल्या
हा नेहमी यशस्वी हटयोग होत नाही
३.
समजुतीचे पीक कोणी घेत नाही
कुंपणाला खायलाही शेत नाही
आशयाचे मोल आहे एवढे की
जा तुला मी शब्द माझा देत नाही
दुःख कळले पाखरांच्या काळजाचे
सोबतीला झाड नेता येत नाही
जो हवा तो अर्थ तू जर काढतो तर
जा तुझ्याशी बोलण्याचा बेत नाही
मौन झाले आवडीचे एवढे की
त्या ठिकाणी मी मनाला नेत नाही
.................................................
विजया टाळकुटे
No comments:
Post a Comment