तीन गझला : गोपाल मापारी



१.
 
धर्माचा सूर्य बुडावा,एखाद्या सायंकाळी
एकाच तिथीला यावी,यंदाची ईद-दिवाळी.

रडताना डोळा लवणे,हे लवणे नसते केवळ.
तर एक पापणी अपुली,देते दुसरीला टाळी.

मी तर गुलमोहर आहे,मज श्रावण माहित नाही.
ग्रीष्माचा वणवा देतो,माझ्या रंगास झळाळी.

देहास झाड म्हणतो मी,मन आहे त्याची फांदी.
मनसोक्त बसा कोणीही,पण तोडू नये डहाळी.

पोटात ठेवतो आम्ही,ज्या अंधाराला दिवसा.
त्याचीच घरावर अमुच्या,रात्रीला असते पाळी

३.
नुसती दुकाने गावभर गावाकडे.
पण खायला नाही जहर गावाकडे.

वळली जिव्हाळ्याची लहर गावाकडे.
उलटे पळत सुटले शहर गावाकडे.

नात्यांत बारोमास दिसते पानगळ,
येतो सणांना मग बहर गावाकडे.

खुर्चीस चांदीचा मुलामा द्या भले,
द्या डांबराचे दोन थर गावाकडे.

'कँडल' वगैरे आपल्या नशिबी कुठे?
आपण करू 'कंदिल डिनर' गावाकडे.

येतील कोणाचे तरी अश्रू घरी.
झुरतोय आशेने पदर गावाकडे.

खपला जरी हा देह या शहरामधे,
मन राहिले आयुष्यभर गावाकडे.

३.
धुऱ्यावर आडवा लावून नांगर...कापले गेले.
तिऱ्हाइत आणुनी मध्यस्थ वावर कापले गेले.

स्मशानातून मी गावाकडे पाहून पुटपुटलो.
अरेच्या! जन्मभर इतकेच अंतर कापले गेले?

कधी जमिनी गिळाया तर,कधी मग अर्जुनासाठी.
अडाणी अंगठे अमुचे निरंतर कापले गेले.

किती सण,वार आयुष्यात आले आठवत नाही,
मला इकतेच स्मरते,केक शंभर कापले गेले.

कलाकुसरी नव्या हातांत आधी ओतल्या गेल्या,
जुने कारागिरांचे हात नंतर कापले गेले.
.......................................................

गोपाल मापारी
मोताळा, बुलढाणा. 

2 comments: