दोन गझला : संजय चौधरी

 

१.

डोळ्यांमधला मुका इशारा आठवतो
ओठांवरचा जुना शहारा आठवतो

किती कितीदा विसरू म्हणतो मी ज्याला
तुझ्या चेह-याचाच नजारा आठवतो 

आठवणींची भरती येते कधी कधी
तुझ्या मिठीचा समुद्र खारा आठवतो

डोळे मिटुनी जातो त्या जगण्यात पुन्हा
फुललेला तो तुझा निखारा आठवतो

पुन्हा पुन्हा तू सावरायची केस तुझे 
अजूनही तो खट्याळ वारा आठवतो

रात्र रात्रभर असायचा अपुल्यासोबत
नभातला शुक्राचा तारा आठवतो

जिथे घसरला माझ्यासोबत पाय तुझा 
मज त्या एकांताचा पारा आठवतो 

डंख मारला प्रेमाने मग तुला मला
त्या नंतरचा गोड उतारा आठवतो

आठवणींचे गाव वसवले मनात मी 
जगण्याचा तो मोरपिसारा आठवतो

 २.
कुठली हिरवळ, कुठला दरवळ, बाग मनाची सुकली आहे 
जगणे म्हणजे काही नाही जखमेवरची खपली आहे 

फिरतो आहे घाण्याभवती, कोण कुठे का पोचत असतो 
अवतीभवती फिरणारी ही सारी दुनिया नकली आहे 

किती कशी मी समजुत घालू समजत नाही उमजत नाही 
शाळेपासुन एक बाहुली माझ्यावरती रुसली आहे 

गुलमोहर मज म्हणायची ती पोर कुठेशी हरवून गेली 
जुन्याच काही आठवणींची उदासली भातुकली आहे 

नव्या काय अन जुन्या काय या जखमा नुसत्या छळती मित्रा
कितीतरी असल्या जखमांनी दुनिया माझी सजली आहे

खेळ मांडता मोडुन टाकी नजर तिची माझ्यावर आहे
खुळ्याच माझ्या जगण्यावरती नियती खुनशी हसली आहे

जे आहे ते असेच आहे ही अश्रूंची जत्रा आहे 
शिक्षा इथल्या जगण्याची  का कधी कुणाला चुकली आहे 
.........................................................
 
संजय चौधरी

4 comments:

  1. दोन्ही गझला अप्रतिम सर👌👌 अभिनंदन!💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सर

      Delete
  2. दोन्ही गझला सुंदर


    मिठीचा खारा समुद्र

    इथल्या जगण्याची शिक्षा

    👌🌹🦚

    ReplyDelete
  3. आशयघन शब्दांचे एव्हरेस्ट 👌❤👌

    ReplyDelete