तीन गझला : हेमंत जाधव



१.

पापण काठावरती जेव्हा भरून येते कोणी
सुंदरसे मग अंतरातुनी सजून येते कोणी

आठवणींच्या हिंदोळ्यावर मन एकाकी झुलते
आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून येते कोणी

किती लाघवी गूज चालते नजरेचे नजरेशी
डोळ्यांमधुनी अंतरात मग फिरून येते  कोणी

शत जन्मांच्या मरुभूमीवर पुष्प उमलते जैसे
जगणे आनंदाने भरण्या फुलून येते कोणी

बिरबला तुझी 'दूरचा दिवा' गोष्ट वाचली आहे
तशीच माझी उर्जा बनुनी दुरून येते कोणी

किती गोड हा भास मला, "हेमंत" लाभला आहे
माझ्यासाठी स्वत:शी जसे हरून येते कोणी

२.

आयुष्याला पुरून उरते कमतरता
रितेपणाने तुडुंब भरते कमतरता

तू जगण्याचा गंध दिला मज पहा नवा
तुझ्या रूपाने सोबत असते कमतरता

गरज,निकड,आधार, म्हणू मी काय तुला?
तुझे मनावर नाव उमटते  "कमतरता"

हृदयावरची फुंकर झाली, परी जशी
तुझ्या स्मृतींनी भरून निघते कमतरता

भास तुझे होतात अता स्वप्नात मला
किती छान ही मलाच हसते कमतरता

एकाकीपण खाया उठते तुझ्याविना
मृगजळ बनते, हताश झुरते कमतरता

सहवासाचे अत्तर जाते उडून हे
भासांची पण कधी भासते कमतरता?

प्रीत म्हणावे सावरणा-या हाताला
तुला नवे 'हेमंत' शिकवते कमतरता

३.

दारिद्र्याच्या शेतामध्ये नांगर  फिरला नाही
पाषाणाच्या नदीत यंदा पूर पेटला नाही

अस्मानी सुल्तानी चा इतिहास शोधुनी सांगा-
या देशाचा शेतकरी झाडास लटकला नाही..?

पतपेढ्यांनी लुटली पत जे होते नव्हते नेले
बरोबरीच्या लेकीचा मग हात उजवला नाही

हवामान खाते हे अपुले काय नेमके खाते
दरवर्षाला चुकण्याचा अंदाज चुकवला नाही

गूगल वरून घेती अमुच्या नुकसानीची झडती
ज्यांच्या बापाने शेताचा बांध पाहिला नाही

शेतीपायी वखरण झाली पोशिंद्या देहाची
"माल लगाओ माल मिलेगा" सूत्र समजला नाही

माझ्या ऋणको बापाचा तो धनको ज्ञानी होता
"मठ मुंगाचा..!" या शब्दाचा अर्थ शिकवला नाही

कोरी पाने दरवर्षी मी काढुन ठेवत होतो
जुन्या वह्यांचा पुनर्जन्म हा कधीच थकला नाही

नाते-गोते, देणे-घेणे नोंदी लागत गेल्या
बोजा त्याच्या जगण्यावरचा कधी उतरला नाही

फक्त उतारा कोरा व्हावा स्वप्न एवढे होते
मालकिणीला कब्जा देउन पुन्हा परतला नाही

हे न जरूरी की जन्माला त्याच्या पोटी यावे 
खंत हीच' हेमंत', तयाला कुणी जाणला नाही 

.................................................................

हेमंत जाधव

No comments:

Post a Comment