दोन गझला : गिरीश जोशी



१.

बंधने हळव्या मनावर घातली
सोडली नाही कधी मी पायरी

प्रेम नावाचा यमन गातोय मी
गात आहे ती उगाचच भैरवी

पापण्यांचे ज्याक्षणी भरते धरण
आसवांना वाट करतो मोकळी

केवढा आधार आहे वाटला
एक दिसली झोपडी काठावरी

गरज असतांना सुखाने सोडले
दुःखनावाची मिळाली पोटगी

लाख गुपिते ठेवते पोटात ती
त्यामुळे तर मूठ आहे झाकली

पूर्तता ना एकमेकांच्या विना
बासरी तू पोकळी मी त्यातली

मोगऱ्या तू गंध दे दुसऱ्या कुणा
राहते हृदयात माझ्या कस्तुरी

मी नव्याने झेप घेऊ लागलो
भेटली होतीस तू मध्यंतरी

फक्त स्पर्शानेच मिटते वेदना
माय म्हणजे आपला धन्वंतरी

२.

भुकेजलेल्या पोटामध्ये कळ येते
तिच्यामुळे जगण्याचे आम्हा बळ येते..

सरळ चालण्याचा मी प्रयत्न करतो पण
वाटेमध्ये वळण पुन्हा अवखळ येते

तिच्या सावलीने रस्ता शायर होतो
ती जाताना फुलांतही दरवळ येते

असे एकदा जवळ तिच्या जावे म्हणतो
जसे तिच्या डोळ्यांपाशी काजळ येते

सर्वश्रेष्ठ दात्याचा विचार करताना
डोळ्यांसमोर आईची ओंजळ येते

जेव्हा जेव्हा नाश जवळ येतो अपुला
तेव्हा तेव्हा बुद्धीला भोवळ येते
....................................................

गिरीश शाम जोशी 'गझलगिरीश'
औरंगाबाद
९२२६७५०६२१

1 comment: