दोन गझला : लक्ष्मण उगले


 
 
१.

राहतो चुपचाप म्हणजे शांत नाही 
पाहिला तू आतला आकांत नाही 

रक्त आम्ही ओकतो मातीत येथे
कास्तकारी ऐतखाऊ प्रांत नाही 

का असा रेंगाळतो देहात आत्म्या
श्वास घेण्याची मला जर भ्रांत नाही 

भाषणे ठोकू नका श्रद्धांजलीपर
लाभला आयुष्यभर एकांत नाही 

का बरे मज गोड इतके बोलली ती 
सण म्हणावे आज तर संक्रांत नाही

२.

कितीदा बोललो आपण कितीदा रंगल्या गोष्टी 
कधी सांगीतल्या नाहीस पण तू आतल्या गोष्टी

तुझ्याशी भेट झाली पण न झाल्यासारखी झाली 
तरीही चावडीवर रंगल्या भेटीतल्या गोष्टी

जरासा स्पर्श झाला तर किती रोमांचते तनमन
कुठे शिकल्या शरीराने सखे स्पर्शातल्या गोष्टी

जरी तू बोलली नाहीस ओठांनी अवाक्षरही
तरी कळतात ह्रदयाला तुझ्या ह्रदयातल्या गोष्टी

तुझ्या पायातले पैंजण किती करते छननछनछन
कदाचित ऐकल्या त्याने तुझ्यामाझ्यातल्या गोष्टी
....................................

लक्ष्मण उगले
कारेगाव बु.।। ता.खामगाव
जि.बुलढाणा
९९२३३५६३२८

No comments:

Post a Comment