दोन गझला : सुरेश शेन्डे

 

१.

आठवण माझ्या उशाशी मी निरंतर ठेवतो
एक व्रण माझ्या उशाशी मी निरंतर ठेवतो..

श्वास विरघळले तुझ्या श्वासांत माझे एकदा
तोच क्षण माझ्या उशाशी मी निरंतर ठेवतो..

पापण्यांच्या आड मी अडवून माझी आसवे
का धरण माझ्या उशाशी मी निरंतर ठेवतो..?

खेळलो,अन् भांडलो, विसरून गेलो शेवटी
'बालपण' माझ्या उशाशी मी निरंतर ठेवतो..

मी तुला विसरू शकत नाही तरीही का बरे;
विस्मरण माझ्या उशाशी  मी निरंतर ठेवतो..?

ऐकवित गेलीस तू, अवघे  उखाणे  माझिये
तोच 'सण' माझ्या उशाशी मी निरंतर ठेवतो..

"चारजण" माझ्या उशाशी मी निरंतर ठेवतो
का? मरण माझ्या उशाशी मी निरंतर ठेवतो..

२.

काय आहेत त्रास रस्त्याला?
जा विचारा उदास रस्त्याला..

फक्त थोडीच वाहवा केली 
पार चढली मिजास रस्त्याला..

चारचौघांत मान्य केले की,
दोन होते समास रस्त्याला..

हाय..माझाच तोल गेल्यावर 
दोष देऊ कशास रस्त्याला..?

थांबणाऱ्यास माहिती नसते
काय असतात त्रास रस्त्याला..?

कैफियत मी कुणापुढे मांडू..?
प्रश्न पडला भकास रस्त्याला..
.....................................
 
सुरेश शेन्डे,
गडचिरोली

No comments:

Post a Comment