चार गझला : आकाश कंकाळ

 

 
१.

हृदय अलवारसे तुटणे, खरे तर ही गझल आहे
कुणावाचुन कुणी जगणे,खरे तर ही गझल आहे

कुणाचे दुःखही आपण कधी समजू शकत नाही
कुणाची आसवे पुसणे, खरे तर ही गझल आहे

तिचा नव्हता ऋतू आला खरोखर पानगळतीचा
तुझ्यासाठी तिचे झडणे, खरे तर ही गझल आहे

तुझी तरली जरी गाथा ,तुला तरता कुठे आले?
विठूमध्ये तुझे बुडणे ,खरे तर ही गझल आहे

कशाचे खत,कुठे पाणी? ऋतूही सोबती नव्हते
स्थितीमध्ये अशा उगणे, खरे तर ही गझल आहे

बटांशी खेळते आहे ,स्वतःशी बोलते आहे
तिला केवळ बघत बसणे, खरे तर ही गझल आहे

तिचे ते ओठ म्हणजे की, जणू  मिसरेच शेराचे
गझल पाहुन गझल सुचणे,खरे तर ही गझल आहे

तिचे वृत्तामध्ये हसणे, कमी शब्दांमध्ये नटणे
खयालातुन हृदय चिरणे, खरे तर ही गझल आहे

२.

फोड किती पायांना आले
थेंब किती डोळ्यांना आले ?

पत्रामधुनी बोललीस तू
ओठ जणू शब्दांना आले

गाव आठवत होता जो तो
'काय दिवस' गावांना आले

मनातही' ना येते कोणी
हो जाळे  दारांना आले

छाटत होते तेव्हा नाही
नंतर बळ पंखाना आले

केल्या होत्या तिने भाकरी
गंध तिचे घासांना आले

मधाळ इच्छांचे हे पोळे
उरातल्या झाडांना आले

वाढत आहे रोज आकडा
कितीक भय कानांना आले?

उपाय जो तो सांगत होता
ज्ञान किती लोकांना आले

स्पर्श गुलाबाचा ओठांवर...
मग काटे  दोघांना आले

३.

देव तो मुर्तीतला.... होवून बसला 
अन स्वतःचे दगडपण विसरून बसला

वाटते हे जग मला झाडाप्रमाणे
रोग 'वेली'सारखा बिलगून बसला

कर्णफुल केसांमधे गुंतून जावे
त्या प्रमाणे जीव हा अडकून बसला

जीवघेणा कोंडमारा समजल्यावर
पिंजऱ्याचे दार तो उघडून बसला

हे किती भांडण पुढे जाईल मित्रा
'का' जुन्या गोष्टी पुन्हा  उकरून बसला

चांदणे पाण्यात दिसले...स्पर्श केला
का उगा "आकाश" ते ढवळून बसला

४.

तिचा मधुमास गेल्यावर,मनाला त्रास झाल्यावर
करावे बंद आठवणे तिचा तो भास झाल्यावर

कुठे शिकलास तू मित्रा कलाकारी अशी ही तू?
दगा केलास  तू  माझा पुरा विश्वास झाल्यावर

सिते रामावरी इतका नको विश्वास तू ठेवू 
कशी  अग्निपरीक्षा ही? पुरा वनवास झाल्यावर

जसा माणूस आहे रे तसा आत्माच हा स्वार्थी
निघोनी दूर तो जातो जुने हे मास झाल्यावर

तशी नसतेच जगण्याची मला आशा अपेक्षाही
खुशीने जीव गुदमरतो मिठीचा फास झाल्यावर

तुझा मी प्राण होतो अन् शहाराही कधी काळी
मलाहे रोज आठवते तुझा आभास झाल्यावर

बियाण्या सारखा मृत्यू मला ही दे कधी देवा 
किती आनंद होतो बघ कुणाचा घास झाल्यावर
.........................................

आकाश कंकाळ,
नाशिक

1 comment: