दोन गझला : संघमित्रा खंडारे


 
 
१.

जा, तुझे नाही बरे हे वागणे
आत अगदी खोल निझरत राहणे

तू ऋतू होऊन आला जीवनी
केवढे आयुष्य झाले देखणे

स्पर्श तू अलवार इतका पेरला
देहभर लगडून आले चांदणे

ये अता बस एकदा भेटावया
या मनाचे फिटत नाही पारणे

दिवस व्याकुळ, सांज कातर रोजची
रात्रभर अन् टक्क जागे राहणे

नेमक्यावेळी असा तू मौन का?
कठीण जाते अर्थ ज्याचे लावणे

मोकळा केलास का हा कासरा?
मी अता विसरुन गेले धावणे!

२.

उत्तरे होती जरी बिनचूक माझी
एक शंका पण तरी अंधूक माझी

ठेवली लक्षात तू कित्ती बरोबर
केवढी साधीच होती चूक माझी

थोपटुन ठेवू कितीदा ही अशी मी
अर्धपोटी वा उपाशी भूक माझी

कार, नोकर, बंगला...सारेच आहे
कोणती इच्छा तरीही मूक माझी!

जे अमंगळ, कुरुप ते उरणार नाही
लेखणी झाली अता बंदूक माझी
........................................

संघमित्रा खंडारे,
दर्यापूर जि. अमरावती

No comments:

Post a Comment