१.
वेळ घालवत बसलो आहे
पत्ते खेळत बसलो आहे
ताटामध्ये घरच्यांच्या मी
स्वप्ने वाढत बसलो आहे
खिशात नाही दमडी तरिही
यादी बनवत बसलो आहे
किती काळजी मला जगाची
बातम्या बघत बसलो आहे
गरज मला शिकण्याची आहे
पण मी शिकवत बसलो आहे
गूगलवर माझ्या भाग्याचा
मॅप निहाळत बसलो आहे
आणि विठ्ठला तुला शेवटी
संधी मागत बसलो आहे
२.
तुला मी पाहिले की व्हायचे काहीतरी
तुझे डोळे मला सांगायचे काहीतरी
पुन्हा नुसतेच आलो घेउनी दर्शन तुझे
पुन्हा बघ राहिले मागायचे काहीतरी
जुने मी आठवत जेव्हा बसायाचो रडत
अचानक त्यामधे हसवायचे काहीतरी
कुणी नाही करत उद्धार कोणाचा कधी
तरीही का उगा बोलायचे काहीतरी?
जरा पाहून रस्ता चाल वेड्या माणसा
बिचाऱ्या मांजरीला व्हायचे काहीतरी
३.
नकोस आणू आव सुखाचा संशय येतो आहे
तुझाच नाही मला स्वतःचा संशय येतो आहे
गढूळ झाली नजर एवढी गाळ पाहुनी इथला
जरी निरागस पण कमळाचा संशय येतो आहे
मला प्रयोजन सांगा कोणी माझ्या ह्या जन्माचे
मलाच माझ्या अस्तित्वाचा संशय येतो आहे
तू नसण्याची सवय अताशा मला एवढी झाली
अता तुझ्या सोबत असण्याचा संशय येतो आहे
वहीत माझ्या तुझा कुठे संदर्भ सापडत नाही
कधी तुझ्यावरही लिहिल्याचा संशय येतो आहे
नकोस होऊ बाळा मोठा असे वाटते आहे
दुषीत भोळे मन होण्याचा संशय येतो आहे
................................................
विशाल ब्रह्मानंद राजगुरु
No comments:
Post a Comment