तीन गझला : एस.जी. गुळवे



१.

चालत नाही माझे नाणे बाकी काही नाही
आयुष्याचे हे गाऱ्हाणे बाकी काही नाही

हाक दिली पण अर्थ वेगळा नकोस लावू त्याचा
हेतू केवळ सोबत जाणे बाकी काही नाही

घे झडती ओठांनी ओठांची मग कळेल तुजला 
ओठांवर या तुझेच गाणे बाकी काही नाही

 जास्तच दुःखी आहे माझे जीवन सर्वांपेक्षा 
ज्याचे त्याचे हे रडगाणे बाकी काही नाही 

जमाखर्च या आयुष्याच्या केल्यावरती कळले
उरले हाती चणेफुटाणे बाकी काही नाही

२.

कितीदा हेच तर घडते
व्यथा आयुष्य पोखरते 

मनाचा रंग उजळावा
कुठे ती पावडर मिळते?

जसे असते तसे नाही 
जसे पाहू तसे दिसते

नको सांगूस ओठांनी
मला डोळ्यातले कळते 

तिला मी आवडत नव्हतो 
मला हे आवडत नव्हते 

मनाचे पाखरू बनते
तिच्या घरट्याकडे फिरते 

पुन्हा येते शिखर जवळी
पुन्हा आयुष्य गडगडते
 
     
३.

अता कशाची चणचण त्याला ?
दुःख मिळाले आंदण त्याला 

जन्म आपला उघडे भांडे
मृत्यू म्हणजे झाकण त्याला 

घुसमटलेले घर म्हणते की
 एक पाहिजे अंगण त्याला 

घरी मुलाचा श्वास कोंडतो
दाखवतोस क्रिडांगण त्याला ?

घर डोळ्यांचे छोटेखानी
आणि पापण्या तोरण त्याला
................................................... 
 
एस.जी.गुळवे

1 comment: