१
जायचे पुढे आहे... कोण थांबतो मागे?
चालतो पुढे, त्याच्या काळ चालतो मागे...
मी कसा म्हणू सांगा? पावसास वांझोटा
पापण्यात जर थोडी ओल ठेवतो मागे...
या पराभवापेक्षा खंत वाटते याची
आपल्यातला कोणी पाय ओढतो मागे...
मी परिस्थितीसोबत हात मिळवणी करतो
मी अपूर्ण इच्छांना रोज सोडतो मागे...
या छतामुळे कोठे? सावली घरी आली
बाप सावलीसाठी... ऊन सोसतो मागे...
२.
चेहऱ्यावर ना उमटले भाव आईचे...
का? मुके असतात माझ्या घाव आईचे...
जीवनाच्या खेळपट्टीवर सुरू जगणे
मेणबत्तीसारखे निर्धाव आईचे...
फक्त प्रेमावर तिच्या, माहेर रुसल्याने
शोधते चंद्रामधे ती गाव आईचे...
जाणतो, तुलना तिची होऊ शकत नाही
ईश्वराच्यावर समजतो ठाव आईचे...
पोरके वाटायचे आईविना म्हणुनी
मी दिले माझ्या घराला नाव आईचे...
३.
माझ्या समान माझ्या सांभाळ बासरीला
आलीच आठवण तर कवटाळ बासरीला
तो फक्त स्पर्श नव्हता अलवार वार होता
लावून ओठ केले घायाळ बासरीला
अंगावरी फिरवले तू मोरपीस अन मी
केले तुला समर्पित तात्काळ बासरीला
मी जाणवेल केवळ दिसणार मात्र नाही
देऊन श्वास माझ्या पडताळ बासरीला
होणार ना कधीही ती लुप्त कृष्णविवरी
तारेल हे गुलाबी आभाळ बासरीला
झाले कुठून इतके स्वर आर्त सांजवेळी
बहुतेक याद आला गतकाळ बासरीला
ओठांवरी तुझ्या बघ येईल गीत माझे
तू टाळ बासरीला वा जाळ बासरीला
४.
मिसळले तुझे श्वास श्वासात माझ्या
शहारून गेलीस स्पर्शात माझ्या
हवा हा दिलासा प्रवासात माझ्या
असू दे तुझा हात हातात माझ्या
मला वाटतो वेगळा रंग माझा
मिसळला तुझा रंग रंगात माझ्या
घडत सर्व आहे मनासारखे हे
जणू काय मी आज स्वप्नात माझ्या
तुझी ओढ असते तुझा ध्यास असतो
तुला मी सजवतो खयालात माझ्या
मला ना कळे काय होईल आता
वितळले तुझे ओठ ओठात माझ्या
कसा सावरू तोल मी काळजाचा
फिरवलास तू हात केसात माझ्या
कपाळास माझ्या जसे चुंबले तू
उतरली जणू वीज देहात माझ्या
..................................
निलेश कवडे
अकोला
nice
ReplyDeleteधन्यवाद
Deleteफारच सुंदर चारही गझल
ReplyDeleteधन्यवाद
Deleteचारही रचना सुंदर
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete