तीन गझला : सुनीति लिमये


 
१.
सांगणारे फारसे नाही कुणी
सांधणारे फारसे नाही कुणी

खाचखळग्यातून आहे चालणे
भेटणारे फारसे नाही कुणी

गाव चर्चेनेच नुसता गाजला
पाहणारे फारसे नाही कुणी

हुंदका ती दाबते आहे पुन्हा 
ऐकणारे फारसे नाही कुणी

व्यर्थ आहे कृष्णगीता...वेदही
जागणारे फारसे नाही कुणी

मूक झोपाळे..उसासे बागही
खेळणारे फारसे नाही कुणी

एकटी आजी जुन्या वाड्यातली
बोलणारे फारसे नाही कुणी

२.
उपचाराचे, केवळ उरते
जेव्हा नाते, पोकळ उरते

जागी होते, स्वप्नामधुनी
थकल्या डोळी, जळजळ उरते

घरटे तुटते, एका रात्री 
पानांची मग, सळसळ उरते

तो जातो अन्, विझल्या डोळी
घन भरलेले, काजळ उरते

जाणारा, अर्ध्यातुन जातो
नंतर केवळ, हळहळ उरते

तू गेल्यावर, माझ्यापाशी
आठवणींची, वर्दळ उरते

३.

दोघांमधले, वाद संपले, नंतर नंतर
इतके अजून, पडले अंतर , नंतर नंतर

आता नाही, परतायाची, पिले घराशी
पक्षांनी, समजून घेतले, नंतर नंतर

प्रेमळ झाडे, जुनेच वाडे, पाणवठाही
गावाकडची, वाट विसरले, नंतर नंतर

वाहत गेले, ओझी, कुठल्या परंपरांची
बेड्या म्हणजे, हार वाटले, नंतर नंतर

शहरी वेग कळाया, थोडा, वेळ लागला
या सगळ्याचा, भाग जाहले, नंतर नंतर
.............................................

सुनीति लिमये 
८४३, सदाशिव पेठ 
गुणगौरव सोसायटी 
फ्लॅट क्र १, पहिला मजला 
खालकर तालमीजवळ 
पुणे ४११०३०

मोबाईल नंबर  - ९९७५९००४६७
ई मेल - suniti.limaye@gmail.com

No comments:

Post a Comment