आठवणी सुरेश भटांच्या : अविनाश चिंचवडकर

        

                         १९८७ ते १९९७ या काळात माझे नागपूरला वास्तव्य होते. त्या काळात सुरेश भटांनी पेटवलेली गझलची मशाल पूर्ण वेगाने धगधगत होती. अखाख्या तरुण पिढीला त्यांच्या गझला आणि नादमधुर गीतांनी वेड लावले होते. मी आणि माझा लहान भाऊ (सध्या वास्तव्य कॅलिफोर्निया) दोघेही गझलांमुळे झपाटले गेलो होतो.

        खरंतर सुरेश भटांच्या कवितांची माझी ओळख थोड्या वेगळ्या पध्दतीने झाली होती. मी हिंगणघाटला असताना तेथे हरिहर पेंदे नावाचा एक अवलिया चित्रकार होता. त्याने आणि त्यांच्या चमूने बस स्थानकाच्या भिंतींवर प्रसिद्ध कवींच्या कविता लिहून ठेवल्या होत्या. त्यावेळीच दुष्यंत कुमार यांच्या "कौन कहता हैं, आस्मान मे सुराग नाही होता" या प्रसिद्ध ओळी वाचल्या होत्या. तेव्हाच सुरेश भटांच्या काही ओळी वाचण्यात आल्या आणि मी विलक्षण प्रभावित झालो. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, हे लक्षात आले. त्या तरुण वयात या कवितांमधून दिसलेली बंडखोरी खूपच आवडून गेली -

तेव्हा सदेह स्वर्गी गेला जरी तुका
येथील भाविकांना भंडावतात भुका!
ही भूक, हे दरोडे, ही लूट, हे दंगे
हे देवते, फोटो आता का तुझा मुका?

                पुढे मग नागपूरला आल्यावर, त्या काळच्या प्रथेप्रमाणे, ज्या प्रमाणे प्रत्येक वारकरी शेवटी पंढरीला जातो तसेच आम्हीही दादांच्या घराची वारी करायला लागलो. त्या काळात सुरेश भट उर्फ दादा यांचे धंतोली तले  घर म्हणजे विदर्भातल्या सगळ्या नवोदित कवींचे माहेरघर होते. रामकृष्ण आश्रमा समोरच्या गल्लीत त्यांचे घर होते.

        सुरेश भटांसाठी गझल हा एक फक्त काव्यप्रकार नव्हता तर ते आयुष्य भरासाठी घेतलेले एक व्रत होते ! ज्याप्रमाणे वारकरी विठ्ठलाचा ध्वज खांद्यावर घेऊन पंढरीची वाटचाल करतात, त्याप्रमाणे सुरेश भटांनी गझलेचा ध्वज खांद्यावर घेऊन आयुष्यभर वाटचाल केली. 

कुणाही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला 
जिथे नाचे विठू झेंडा तिथे हा रोवतो आम्ही 

    दिवसाच्या कोणत्याही प्रहरी भटांच्या घरी जा, सतत कुणीतरी बसलेले असे. दादा त्यांच्याशी चर्चा करीत असत. कुणाची गझल दुरुस्त करीत असत किंवा स्वत: ची मस्त जमलेली गझल कुणालातरी वाचून दाखविताना दिसत !भटांच्या भोवती सतत माणसांचा सतत गराडा असे ! लोकांमध्ये रमणारा हा माणूस होता ! आणि माणसे तरी किती वेगवेगळ्या प्रकारची ?  कवी, लेखक, प्रकाशक, पत्रकार, राजकीय कार्यकर्ते,उर्दू गझलकार, वऱ्हाडी कवी असे अनेक प्रकारचे लोक त्यांच्याकडे बसलेले असत. 
        भटांचा विश्वासू सहाय्यक आणि आमचा मित्र ताराचंद चव्हाण सगळ्यांचे स्वागत करीत असे ! अस्सल विदर्भी माणसाप्रमाणे, भटांना कधीही चहा पिण्याची तल्लफ येई आणि मग सौ. पुष्पाताई सगळ्यांसाठी न कुरकुरता चहा करीत! त्या अत्यंत शांत, सात्विक आणि सोशिक होत्या. भटांची मैफिल सकाळी सुरु व्हायची, पण ती कधी संपेल ते कुणीच सांगू शकत नसे. रात्री दोन वाजे पर्यंतही कधीकधी गप्पांची मैफल जमे!  लोकांचा ओघ अखंड चालू राही. माणसांचा एक गट गेला की दुसरा येउन तय्यार! पण भटांचा उत्साह कायमच राही ! प्रत्येकाशी ते तेवढ्याच आपुलकीने आणि उत्साहाने बोलत! एखादा गावाकडला भिडू भेटला तर ते खास वऱ्हाडी भाषेतही प्रेमाने त्याची विचारपूस करीत!  एखाद्या मित्राशी गप्पा करण्याची लहर आली तर ते रात्री दीड वाजताही त्याच्याकडे जायला कमी करत नसत. आणि त्यांचे स्नेहीपण त्याबद्दल अजिबात तक्रार करीत नसत! त्यांच्या या मनस्वी वागण्यामुळेच त्यांच्या बद्दल अनेक आख्यायिका तयार झाल्या होत्या, पण या सगळ्याच्या मागे होती आपुलकी आणि प्रेम!

    दुर्देवाची गोष्ट म्हणजे या इतक्या माणूसवेड्या कवीची बाहेरच्या जगात वेगळीच प्रतिमा निर्माण करण्यात आली होती. रागीट, संतापी आणि विक्षिप्त अशी त्यांची प्रतिमा जाणून बुजून तयार करण्यात आली होती. दादा स्पष्टवक्ते जरूर होते, एखादी कविता आवडली नाही तर ते त्या कवीला सुनावायला कमी करत नसत. पण त्यामागे एक प्रकारची तळमळ होती ! विशेषतः शुद्धलेखनाच्या चुका त्यांना अजिबात सहन होत नसत ! त्याचे अजून एका कारण म्हणजे मराठी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते! कवितेमध्ये कुठला शब्द कुठे वापरायचा याचे भान त्यांच्याएवढे फारच कमी लोकांना असावे ! रूढ अर्थाने कवितेमध्ये वापरल्या न जाणारे शब्दही त्यांनी कवितेमध्ये ते सहजपणे वापरीत.  उदाहरणच द्यायचे झाल्यास - 
'त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात' पेंगणे” 
हा शब्द कवितेत वापरण्याचे धारिष्ट्य कुणी करेल का ?  दुसरे उदाहरण म्हणजे -
दूर आलो एवढा की थांबल्या मागे दिशा 
माझिया संगे उद्याची चालती संवत्सरे 

    “संवत्सर” या शब्दाचा इतका सुंदर उपयोग मराठी मध्ये कुणी केला आहे का? त्यांना चीड होती, पण ती भोन्दुपणाची, खोटेपणाची ! साहित्यातले राजकारण त्यांना अजिबात पटत नसे. अश्यावेळी त्यांची लेखणी मग चाबकासारखे फटकारे ओढी !

दिवसाच चोरट्यांनो जाळू नका मशाली 
अजुनी न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली 

या ओळी बघा किंवा -

सोडतांना प्राण त्यांना मी कुठे बोलावले 
खातरी झाली न त्यांची ते घरी डोकावले 

किंवा -

तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे 
तुमच्यात येऊ मी कसा, बदनाम झंझावात मी !

        अशा ओळी वाचून वाटायचे कि जगाबद्दलचा केवढा संताप या माणसाच्या मनात भरलेला आहे. अश्या कुठल्या वेदना असतील त्यांच्या मनात कि ते प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा सोडत नसत?

तेव्हा सदेह स्वर्गी गेला जरी तुका 
येथील भाविकांना भंडावतात भुका 

किंवा -

संतहो आम्ही जरी हे जन्मण्याचे पाप केले 
लागली नाही अम्हाला लूत रोगी ईश्वराची 


                    पण नवीन कवींबद्दल त्यांच्या मनात आस्था होती ! कुठलाही कवी त्यांच्याकडे आपली कविता घेऊन गेला तर ते आस्थेने कविता वाचत आणि त्यात सुधारणाही सांगत ! खरं म्हटलं तर त्यांनी तरुण गझलकारांची एक पिढीच घडवली ! कविताच काय पण जगातल्या कुठल्याही चांगल्या गोष्टीबद्दल त्यांना आस्था होती.  त्यापुढे मग ते अगदी नतमस्तक होतं. 

साधीसुधी ही माणसे, 
माझ्या कवित्वाची धनी 
यांच्यात मी पाही तुका, 
यांच्यात नाम्याची जनी 

                    मनात एक आणि ओठावर दुसरे असे वागणे त्यांना पसंत नव्हते आणि म्हणूनच त्यांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. मराठी भाषा शिकविणाऱ्या प्रध्यापाकांबद्दल तर त्यांच्या मनात विशेष राग होता. मराठी साहित्याबद्दल अजिबात आत्मीयता नसताना केवळ पोटं भरण्यासाठी मराठी शिकविणे त्यांना पटत नसे. ते जितके स्पष्टवक्ते होते तेवढेच दिलदारही होते. एखादी कविता आवडली तर त्या कवितेचे ते तोंड भरून कौतुक करीत. असाच एकदा त्यांना माझ्या कवितेतला एक शब्द आवडला होता आणि त्यांनी अगदी मनापासून दाद दिलेली आठवते. त्यांचे वागणे लोकांना थोडे विक्षिप्तपणाचे वाटे, पण अति प्रतिभावान लोकांना खरतरं हा एक शापच असतो ! गरज असते ती आजूबाजूच्या लोकांनी त्यांना समजावून घेण्याची ! भटही तसे लहरी होते. त्यांना कधीही काहीही खाण्याची तल्लफ येई आणि मग ते समोरच्या माणसाला घेऊन सरळ एखादे हॉटेल गाठीत. आलूबोंडे (नागपुरी भाषेत बटाटेवडे), सामोसे, भजे सगळ्यांचा मग समाचार आणि सोबत अखंड गप्पा !  असेच एकदा त्यांच्या सोबत बटाटेवड्यांचा समाचार घेण्याचे भाग्य मलाही लाभले होते ! आज विचार केला तर ते खरे वाटत नाही. 
                भटांना खरी राजमान्यता मिळाली ती मंगेशकर कुटुंबियामुळे ! हृदयनाथांनी भटांमधला जातिवंत कवी हेरला आणि मग सुरु झाला मराठी संगीताला नवीन दिशा देणाऱ्या गाण्यांचा प्रवाह ! अशी गीते,  भाषा मराठीसाठी नवीन होती !'आज गोकुळात रंग खेळतो हरी',' मेंदीच्या पानावर ','तरुण आहे रात्र अजुनी', 'उष:काल होता होता काळरात्र झाली' ही अशी अनेक गाणी मराठी मनांमध्ये कायमची घर करून बसली ! पण जे लोकं भटांना ओळखत होते त्यांना याचे आश्चर्य वाटले नाही. कारण भटांची प्रतिभा तळपत्या सूर्यासारखीच निर्विवाद होती. 
                एकदा नागपूरला असेच हृदयनाथ अचानक सुरेश भटांकडे आलेत. नेमके घरी कुणीच नव्हते. भटांची लगबग सुरु झाली. माझा लहान भाऊ नेमका तिथे उपस्थित होता. त्याने प्रसंगावधान राखून दादांची खोली स्वच्छ केली आणि हृदयनाथ व त्यांच्या सोबतच्या लोकांची  बसण्याची व्यवस्था केली !  हृदयनाथ गेल्यानंतर दादांनी त्याचे हात हातात घेऊन म्हटले, “ तू एवढा इंजिनियर माणूस, पण माझ्यासारख्या कवीची खोली झाड्लीस?”. त्यांना अगदी भरून आले होते. नंतर अनेक वर्षांनी आमच्या आईची त्यांची एका कार्यक्रमात भेट झाली, तेव्हा त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला. त्यांच्या मनाचा उमदेपणा यामधून दिसून येतो. असा हा मनस्वी कवी ! त्यांच्या रोखठोक, स्पष्टवक्त्या चेहऱ्यामागे एक अतिशय हळवे मन लपले आहे, हे लोकांना कळू शकले नाही.  त्यांनाही याची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी लिहून ठेवले -

वागणे माझे जगाशी ठीक नाही 
हे मला मंजूर मी सोशीक नाही !

पण आपल्या लेखणीने आपल्याला कधी दगा दिला नाही याचा त्यांना सार्थ अभिमान होता. 

शब्द हे माझे कृपा नाही कुणाची 
लेखणी माझी कुणाची भीक नाही !

                त्याकाळात सुरेश भट अनेक वृत्तपत्रांमधून कवितांचे सदर चालवीत. त्यामध्ये ते नवीन कवींच्या कविता आवर्जून प्रकाशित करत. अनेक कवींना स्वत: पत्र लिहून मार्गदर्शन करीत. प्रदीप निफाडकर, दीपक करंदीकर, म. भा. चव्हाण, इलाही जमादार ही त्यांची आवडती शिष्यमंडळी ! त्यांनी नवोदित कवींच्या गझलांचे एक पुस्तकही प्रकाशित केले होते. त्यामध्ये आम्हा दोघाही भावांच्या गझला त्यांनी प्रकाशित केल्या होत्या. आम्हाला त्यांच्या कविता इतक्या आवडत की बऱ्याचश्या कविता आम्हाला पाठ होत्या आणि आम्ही मित्रमंडळी मध्ये काही ओळी वारंवार म्हणत असू.  अख्या महाराष्ट्राला त्यांच्या जोरकस गझलांनी वेड लावले होते. १९९७ नंतर मी नागपूर सोडले. मुंबई, बंगलोर असा प्रवास सुरु झाला.भावाने तर भारताबाहेरची वाट धरली. हळूहळू आमचे गझल लिहिणे कमी झाले, कारण सतत लिहिण्याची प्रेरणा देणारे भट आता संपर्कात नव्हते. पण तरीही आम्ही जमेल तेव्हा त्यांच्या गझला, त्यांच्या बद्दलच्या बातम्या वाचीत असू. आणि मग २००३ च्या मार्च मध्ये बातमी आली तीच त्यांच्या निधनाचीच ! 
इतक्या प्रतिभावंत कवीचा त्यांच्या हयातीत  महाराष्ट्राने आणि देशाने म्हणावा तसा गौरव केला नाही याची खंत कधीकधी वाटते !
                आज त्यांचे महाराष्ट्र गीत खूप गाजते आहे. “सारेगम” सारख्या कार्यक्रमांमधून त्यांची गीते आवर्जून गायली जातात. कुसुमाग्रज, गदिमा, बा. भ., पाडगावकर, आरती प्रभू, भा. रा. तांबे, बापट, शांता शेळके या दिग्गजांच्या रांगेत सुरेश भट कधीच स्थानापन्न झाले आहेत. आज मराठी कवितेबद्दल बोलतांना सुरेश भटांचा उल्लेख न करणे शक्यच नाही ! पण आपल्या हयातीत मात्र त्यांना सतत संघर्ष आणि उपेक्षा सहन करावी लागली ! आता या सगळ्या गौरवाचा आणि स्तुतीसुमनांचा त्यांना काही उपयोग होणार आहे का ? ते तर साऱ्या व्यथांपलीकडे कधीच निघून गेले आहेत -

गेलो निघून दूर पुन्हा आढळेल का ?
माझा कराल शोध परी सापडेल का ?

झाला किती उशीर, किती लोटली युगे 
आता मला स्मराल, परी मी असेल का ?

आता व्यथेपल्याड  उभा दूरदूर मी 
डोळे तिथे पुसाल - इथे मी ढळेल का ?

---------------------------------------------

अविनाश चिंचवडकर 
206, Saideep Habitat, II main, New Thippasandra, Bangalore - 560075
Mob - 9986196940
avinashsc@yahoo.com

8 comments:

  1. एक अप्रतिम लेख ! सुरेश भटांचं व्यक्तिचित्रण इतकं जिवंतपणे लिहिलं आहे तुम्ही ! शेवटच्या ओळी वाचताना काटा आला

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख. सुरेश भटांची एक व्यक्ती म्हणून ओळख झाली तुमच्या या लेखामधून.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. व्वा अप्रतिम! भाग्यवान आहात तुम्ही, तुमचा इतक्या थोर व्यक्तींसोबत घरोबा होता आणि आमचं ही नशीब की तुम्ही इतक्या उज्वल अनुभवांतून आम्हाला मार्गदर्शन करता नेहमी.
    फार सुंदर लिहिलंय अविनाश सर. पु ल देशपांडेंच्या रावसाहेब ची आठवण झाली. कठोर मुद्रेमागची हळवी आणि सोज्वळ बाजू जशी पुलंनी मांडली तद्वत तुम्ही खूप भन्नाट लिहिलंय सुरेश भटांवर.

    ReplyDelete
  5. खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख..👌👍

    ReplyDelete
  7. खूप सुंदर लेख झाला आहे. आदरणीय सुरेश भट यांच्या बद्दलच्या आठवणी समरसून लिहिलेल्या आहेत. अशा व्यक्तिमत्वांचा परिसस्पर्श आपल्याला लाभला हे मोठे भाग्य आहे.

    ReplyDelete