चार गझला : रविप्रकाश


१.

तिला आरशाची नजर लागली तर?
प्रतीबिंब  माझेच  सांडेल  घरभर !

जगू  देत  नाही ... मरु  देत नाही ?
हळद माखलेली तिची याद उपवर!

तिच्या ' मीपणावर ' म्हणे  आरसाही-
"किती छान दिसतेस नुसतीच वरवर!"

विचारेल  शंका  कुठाहेत  फोटो ?
खुलेआम काळीज फाडेल दिलबर !

फिरे  गरगरा  भोवरा  मी  युगाचा ...
मला नित्य घरघर,मुबारक तिला घर!

३.

दिलदार  दुःख  देते ,  संसार   दुःख  देते .
चिल्लर व्यथाच साली,कलदार दुःख देते!

किर्ती कुणा मिळाली,का वारश्यात सांगा?
भिंतीस  टांगलेली  तलवार   दुःख  देते !

वाटे  निघून  जावे , गर्भात  प्रेयसीच्या ...
एकांत  जीव  घेतो , दरबार  दुःख  देते !

स्वप्नास हाय डसती..कोपरडि  खैरलांजी.
ही  वांझ  झोप  साली , गर्भार  दुःख देते !

इस्टेट  ठेव  तारण..पण, श्वास मोकळा घे.
जल्लाद   जीवनाचे , उपकार  दुःख  देते !

गर्तेत  खोल  जाणे ...ते  ही  मनाप्रमाणे.
बुडत्यास  काय सांगू , आधार  दुःख देते ?

भेटून कैकदाही , जर 'मन' अतृप्त सज्जन.
आजन्म  मग  प्रतीक्षा , चवदार  दुःख  देते!

३.

जीवन कळावयाला नादान होत जावे..
ऐसे निघून जावे श्वासास ना  कळावे!

आला वसंत तोही जर घाव चुंबण्याला.
माझ्या  व्यथाफुलांनी  संसार  दर्वळावे!

ते धन्य..मारती जे  सिंहासनास ठोकर.
ठरवून  जिंकलेले मुद्दाम  मी  हरावे !

पाणी छटाकभर अन् ट्युबवर हिरो तरंगे.
रे पोहणे शिकाया डोळ्यांमधे बुडावे !

तृष्णाच हाय साली जर वाळवंट झाली..
पाण्यास आठवावे..तृष्णेत  तृप्त व्हावे !

४.

झुरावे स्वर्ग सातीही असे  सुंदर असावे घर.
श्रमाने  दर्वळावे; छान  मातीने  मळावे  घर !

फुटावी लाज थकव्याला,जरा काबाड कष्टांनी..
फुले यावीत  घामाला; श्रमाने  मोहरावे  घर !

निघालो दूरदेशी  तर, प्रतीक्षेचे  झुलो  तोरण.
रडावे  उंबऱ्याने अन्  प्रवासाला  डसावे  घर !

चुलीच्या फुंकणीचीही  कधीतर बासरी व्हावी?
फुटावा  कंठ  भिंतींना स्वरांनी गुणगुणावे घर !

विजांनो वाजवा डी.जे...धरेवरती  पडो गारा.
अश्या वेळी मुलांसाठी जरा अपुले गळावे घर !

शिजो पोटात कुक्करच्या; भले छदमी महाभारत.
कणा  कणखर असो राया रडूनीही हसावे  घर!

नका काढू विमा नुस्ता  कुणीही  रक्तनात्यांचा.
स्वतःचे  श्वास  जपतो ना; तुम्ही  तैसे जपावे घर!
.................................................
 
रविप्रकाश चापके
'प्रकाशपुत्र', डुब्बेवार लेआऊट,
नवजीवन कॉन्व्हेंट रोड.
पुसद, ता.पुसद जि. यवतमाळ - ४४५२०४
मो. ८८५५८५५५८५

2 comments:

  1. चारही गझला उंचीच्या... हार्दिक अभिनंदन बंधुराज. 💐💐💐

    ReplyDelete